• Thu. Jun 25th, 2026

    जनगणनेचा शुभारंभ, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘स्व-गणना’ करून नोंदविली माहिती – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2026
    जनगणनेचा शुभारंभ, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘स्व-गणना’ करून नोंदविली माहिती – महासंवाद

    सातारा दि‌. १ – भारताच्या विकासाचा पाया ठरणारी २०२७ ची जनगणना आता अधिक हायटेक झाली असून, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आपल्या ‘कोयना दौलत’ या निवासस्थानावरून ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करून जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी स्वतः डिजिटल पोर्टलवर माहिती भरून जिल्हावासियांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

    यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन,  पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार पिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    “आपली जनगणना, आपला विकास” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली ही जनगणना यंदा डिजिटल स्वरूपात होत आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरगणना केली जाणार आहे. पालकमंत्र्यांनी आज स्वतः ‘स्व-गणना पोर्टल’चा वापर करून ३३ प्रश्नांची उत्तरे दिली आणि ११ अंकी ‘SE ID’ प्राप्त केला.

    शंभूराज देसाई म्हणाले, जनगणना ही केवळ आकडेवारी नसून भविष्यातील नियोजनाचा आरखडा आहे. सातारकरांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःहून आपली माहिती नोंदवावी, जेणेकरून प्रगणकांचा वेळ वाचेल आणि माहितीमध्ये अचूकता येईल.

    ते म्हणाले, १ मे ते १५ मे या कालावधीत सर्व नागरिकांनी पोर्टलवर माहिती भरावी. मोबाईलवर आलेला OTP आणि नकाशावर घराचे अचूक लोकेशन निश्चित करणे सोपे आहे. माहिती भरल्यानंतर मिळणारा ११ अंकी SE ID जपून ठेवावा आणि प्रगणक घरी आल्यावर त्यांना दाखवावा. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून यामध्ये सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed