• Tue. Jun 16th, 2026

    जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध पर्यावरणीय उपक्रमांचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 21, 2026
    जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध पर्यावरणीय उपक्रमांचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार – महासंवाद

    मुंबई, दि. २१ : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे २२ एप्रिल २०२६ रोजी विविध महत्त्वपूर्ण पर्यावरणीय उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सोहळ्यात वसुंधरा रक्षक अभियान २०२६, महा आर पीईटी अभियान, राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या वेबसाईट व लोगोचे अनावरण तसेच इमिशन ट्रेडिंग स्कीम प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

    पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे सकाळी १०.३० वा. हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे विशेष अतिथी असून विभागाच्या सचिव जयश्री भोज उपस्थित असणार आहेत.

    ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’ हे अभियान २२ एप्रिल ते ५ जून (जागतिक पर्यावरण दिन) या कालावधीत राबविण्यात येणार असून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या पाच प्रमुख शहरांमध्ये हे अभियान होणार आहे. या अभियानातून सुमारे दीड लाख ‘वसुंधरा रक्षक’ तयार करण्याचे उद्दिष्ट असून ग्रीन रॅली, सायक्लोथॉन, प्रश्नमंजुषा, हॅकेथॉन, पोस्टर स्पर्धा, स्ट्रीट प्ले आदी उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती केली जाणार आहे.

    तसेच, महा आर पीईटी अभियान अंतर्गत वापरलेल्या पेट बाटल्यांचे स्वच्छ व स्वतंत्र संकलन करण्यावर भर देण्यात येणार आहे. हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृहे, व्यावसायिक केंद्रे तसेच सरकारी व खाजगी कार्यालयांमधून या बाटल्या वेगळ्या गोळा करून त्यांचा पुनर्वापर सुलभ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई व ठाणे येथे संकलन केंद्र उभारण्यात येणार असून यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

    याचबरोबर राज्य वातावरणीय कृती कक्षामार्फत एक नाविन्यपूर्ण वेबसाईट व अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. ही वेबसाईट पर्यावरण विषयक माहिती, संशोधन, धोरणे आणि नागरिकांमधील संवादासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.

    या कार्यक्रमात औद्योगिक प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या इमिशन ट्रेडिंग स्कीम अंतर्गत प्रशिक्षण सत्रांचाही शुभारंभ करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे उद्योगांना उत्सर्जन मर्यादेत राहून परवाने खरेदी-विक्री करण्याची सुविधा मिळणार असून प्रदूषण नियंत्रण अधिक प्रभावीपणे साध्य होणार आहे.

    ०००

    नंदकुमार वाघमारे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed