• Mon. Jun 15th, 2026
    Ahilyanagar News : चारा घेऊन घरी निघाला, पण वाटेत खड्ड्याने घात केला; बैलगाडी उलटून तरुण शेतकऱ्याचा दबून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    रस्त्यावरील खड्ड्यामुळे बैलगाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. जामखेड तालुक्यातील बांधखडक परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    जामखेड तालुक्यात बैलगाडी अंगावर उलटून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, जामखेड : जामखेड तालुक्यातील बांधखडक परिसरात बैलगाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. चव्हाण वस्ती येथे घडलेल्या या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. काल सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गणेश मधुकर चव्हाण (वय २८) हा आपल्या चुलते बाळू गोरख चव्हाण यांच्यासोबत शेतातून जनावरांसाठी चारा घेऊन बैलगाडीतून परत येत होता. खैरी नदीजवळील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे बैलगाडी जोरात आदळली. या धक्क्याने गाडीचा तोल जाऊन ती उलटली. या भीषण अपघातात गणेश चव्हाण बैलगाडीखाली दबला गेला. डोक्याला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

    चुलता गंभीर जखमी

    त्याचे चुलते बाळू चव्हाण हेही जखमी झाले. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत गणेशला मोटारसायकलवरून खर्डा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बार्शी येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद खर्डा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. गणेश चव्हाण हा कुटुंबाचा आधारस्तंभ होता.

    कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंब चालवणाऱ्या या तरुणाच्या अकाली जाण्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. गावात शोककळा पसरली असून संध्याकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    मदतीची मागणी

    शेतात काम करताना झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे गणेश चव्हाण यांच्या कुटुंबाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

    TCS प्रकरणात न्यायही हवा, उद्योगही वाचला पाहिजे; पालकमंत्री मुद्द्यावर भुजबळांचा विरोधकांना सवाल

    छगन भुजबळ यांनी TCS प्रकरणावर संतुलित भूमिका घेत न्याय मिळालाच पाहिजे, मात्र उद्योगाची बदनामी होऊ नये, असे स्पष्ट केले. टाटासारख्या कंपन्यांची प्रतिमा बिघडवणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकला पालकमंत्री नसल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी विरोधकांना प्रश्न विचारत प्रशासन सुरळीत सुरू असल्याचा दावा केला. तसेच महिला आरक्षणाचे स्वागत करत विधानपरिषद निवडणूक ही आकडेमोडीवर आधारित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा