• Fri. Jul 3rd, 2026

    कातकरी वाडी जमीनप्रश्नावर तातडीची कार्यवाही करा – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 7, 2026
    कातकरी वाडी जमीनप्रश्नावर तातडीची कार्यवाही करा – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    मुंबई, दि. ७ : पनवेल येथील कातकरी वाडीच्या जमिनीच्या हक्कांबाबतचा प्रश्न तातडीने निकाली काढून संबंधित कातकरी आदिवासी बांधवांना घरकुलासह विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.

    पनवेल येथील कातकरी वाडीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, महसूल व महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी तसेच कातकरी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    आदिवासी विकास मंत्री वुईके म्हणाले, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जमिनीच्या मालकीचा प्रश्न तातडीने निकाली काढावा. तसेच कातकरी वाडीचे अधिकृत सर्वेक्षण करून तिला ‘आदिवासी वाडी’ म्हणून घोषित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

    पात्र कातकरी बांधवांना घरकुल योजना तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे.

    याशिवाय, ज्या कातकरी बांधवांकडे घरकुलासाठी जमीन उपलब्ध नाही, त्यांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्यपद्धती तयार करावी. कोणताही कातकरी बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री वुईके यांनी केले.

    ०००

    अश्विनी पुजारी/स.सं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed