• Sat. Jun 6th, 2026

    Vasai Crime : व्यवसायातील वादातून मित्राला निर्घृणपणे संपवलं; पार्थिव नदीत फेकलं, पोलिसांचा ड्रोनद्वारे तपास, आठ तासांत आरोपीला अटक

    Vasai Crime : व्यवसायातील वादातून मित्राला निर्घृणपणे संपवलं; पार्थिव नदीत फेकलं, पोलिसांचा ड्रोनद्वारे तपास, आठ तासांत आरोपीला अटक

    वसईत पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक राजपूत यांचा शिरच्छेद करून पुरावे लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसर हादरला आहे.

    वसईत पैशांच्या वादातून मित्राचा खून(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, वसई : वसईतील ही खळबळजनक घटना अत्यंत क्रूर आणि हादरवून टाकणारी ठरली आहे. पैशांच्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राची निर्घृण हत्या करून, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे शिर धडापासून वेगळे केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे वसई परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    किराणा व्यवसायातील वादातून टोकाचे पाऊल

    या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव अशोकसिंग करमसिंग राजपूत (वय ३२) असून ते मूळचे राजस्थानमधील पाली येथील रहिवासी होते. या प्रकरणात पोलिसांनी मदनसिंग चुडावत (२६) आणि विक्रमसिंग चुडावत (३२) या दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक राजपूत आणि आरोपी यांच्यात किराणा मालाच्या व्यवसायातील पैशांच्या देवाणघेवाणीवरून तीव्र वाद झाला होता. या वादाचे रूपांतर संतापात होऊन आरोपींनी अत्यंत थरारक कट रचला.

    अत्यंत क्रूरपणे हत्येचा बनाव

    आरोपींनी अशोक यांना विश्वासात घेऊन बोलावले आणि प्रथम बांबूच्या काठीने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांचा शिरच्छेद केला. ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर चाकूने अनेक वारही करण्यात आले. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे धड पेल्हार (सोपारा फाटा) परिसरातील झुडपात टाकले, तर शिर आणि मोबाईल फोन शिरसाड फाटा येथील नदीत फेकून दिला. या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे सुरुवातीला तपासात अनेक अडथळे निर्माण झाले होते.

    Maharashtra TimesShiv Sena Leader Arrested : पोलिसांना चकवा देत 10 वर्ष राजकारणात सक्रिय; शिवसेनेचा बडा नेता अखेर अटकेत

    पोलिसांची हायटेक कारवाई आणि अटक

    घटनेची माहिती मिळताच वसई पोलीस ठाणे आणि मीरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू केला. केवळ ८ तासांच्या आत तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक, ड्रोन आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी शिरसाड फाटा येथील नदीतून मृताचे शिर आणि मोबाईल जप्त केला आहे. हे पुरावे या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

    न्यायालयीन कारवाई आणि तपास

    या प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३(१) (हत्या) आणि कलम २३८ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि बांबूची काठी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मृतदेहाचे नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले असून, हत्येची अचूक वेळ आणि पद्धत सिद्ध करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

    Maharashtra TimesAshok Kharat Son : कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश, अशोक खरातच्या मुलाला फिल्मी स्टाईल अटक; बायको फरार

    मैत्रीचे नाते रक्ताने माखले

    या घटनेमुळे “मित्रावर विश्वास ठेवला, पण त्याच्याच हातून मृत्यू झाला” ही कटू सत्यता पुन्हा एकदा समोर आली आहे. पैशांच्या वादातून मैत्रीचे नाते वैरात बदलून त्याचा शेवट रक्तरंजित झाला, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वसईतील या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, अशा घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा