• Fri. Mar 20th, 2026

    महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 20, 2026
    महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. २० : नवी दिल्ली येथे आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहंदळे यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा संमेलनाच्या निमंत्रक महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

    सरहद संस्था, पुणे आणि नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हे दोन दिवसीय संमेलन दि. 11 व 12 एप्रिलला होणार आहे. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    भारतीय प्रशासकीय सेवेतील 1974 बॅचच्या लीना मेहेंदळे यांचा जन्म जळगांव जिल्ह्यातील धरणगांव येथे झाला. त्या महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन या पदावरून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी गोवा राज्याच्या मुख्य माहिती अधिकारीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. महसूल, प्रशासन, प्रशासकीय कायद्याची अंमलबजावणी, विकास प्रशासन, कार्यालयीन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असे सर्वच महत्वाचे विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

    लीना मेहेंदळे यांचे विविध विषयांवर 500 पेक्षा अधिक लेख आणि 24 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. त्यांची 19 पुस्तके अनुवादाचीच आहेत. एका मराठी नाटकाचा व एका कादंबरीचाही त्यांनी अनुवाद केला आहे. द लास्ट पास ही इंग्रजी भाषेतील कादंबरी त्यांनी मराठीत अनुवादित केली. लहान मुलांसाठी देखील त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. पक्षीनिरीक्षण, निसर्गोपचार, प्रशासकीय सुधारणा हे त्यांचे आवडते विषय आहेत, संगीचाचीही त्यांना आवड आहे.

    ०००

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed