• Thu. Mar 19th, 2026
    पुण्यातील 12 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ उकललं, समलिंगी संबंधातून नात्यातील तरुणाने संपवलं, 22 वर्षीय तरुण अटकेत

    Pune Minor Boy Death Case : समलैंगिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून संतापाच्या भरात हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : शिरुर तालुक्यातील दहिवडी-मांजरेवस्ती परिसरात मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आलेल्या १२ वर्षीय मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. शाळेतून घरी परतल्यानंतर काही वेळात खेळण्यासाठी बाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा काही तासांत मृतावस्थेत सापडल्याने गावावर शोककळा पसरली होती. अखेर मुलाच्या हत्येमागील गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील दहिवडी-मांजरेवस्ती परिसरात राहणारा १२ वर्षांचा चिमुरडा सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध मोहीम सुरू केली. शोध घेत असताना घराजवळील विहिरीकाठी, ऊसाच्या शेताजवळ त्याचं प्रेत आढळून आलं होतं. शरीरावरील जखमा आणि एकूण परिस्थिती पाहता सुरुवातीला वन्य प्राण्याच्या हल्ल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि स्थानिकांचा संशय यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा तातडीने बदलली.

    समलैंगिक संबंधास नकार दिला म्हणून…

    तपासादरम्यान वेगळंच सत्य बाहेर आले आहे. तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी नात्यातीलच २२ वर्षीय अक्षय नामक तरुणाला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासानुसार समलैंगिक संबंधास नकार दिल्याच्या कारणावरून संतापाच्या भरात हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

    संशय येऊ नये म्हणून गर्दीत मिसळला

    या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर आरोपीने कोणाचाही संशय येऊ नये म्हणून घटनास्थळी जमलेल्या गर्दीत स्वतःला मिसळून घेतल्याचे समोर आले आहे. या कृतीमुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला होता.

    आरोपी अटक, चौकशी सुरु

    पोलिसांनी वेगवान हालचाली करत काही तासांतच प्रकरणाचा उलगडा केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा