• Fri. Jun 19th, 2026

    श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकासकामे भव्य, दिव्य आणि दर्जेदार व्हावीत -पालकमंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 4, 2026
    श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकासकामे भव्य, दिव्य आणि दर्जेदार व्हावीत -पालकमंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : मराठवाड्याच्या श्रद्धास्थानाचा मुकुटमणी असलेल्या श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या विकासकामांना भव्यतेची आणि दिव्यतेची नवी उंची देण्याचा निर्धार व्यक्त करत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली.

    कोट्यवधी भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र असलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास केवळ आजचाच नव्हे, तर पुढील शंभर वर्षांचा विचार करून दूरदृष्टीने आणि उत्कृष्ट दर्जाने व्हावा, अशा स्पष्ट सूचना मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

    बैठकीत तुळजापूर येथील श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भाविकांच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी हुडको पार्किंग परिसरात उभारण्यात येणाऱ्या भाविक सुविधा केंद्र, आधुनिक भक्तनिवास, व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह आणि विस्तीर्ण वाहनतळ अशा विविध प्रकल्पांचा समावेश असलेल्या सुमारे ५८२.१७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याची माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली. यासोबतच या कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन आणि निविदा प्रक्रियेच्या प्रगतीचा देखील आढावा घेण्यात आला.

    यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेशी जोडलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्मितीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य, आकर्षक आणि शाश्वत पद्धतीने करावा. देशातील नामांकित विकासक आणि तज्ज्ञ संस्थांचा सहभाग घेऊन या प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

    “तुळजाभवानी मातेला दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे भाविकांना अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. योग्य नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि उच्च दर्जाची कामे यामुळेच या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास साध्य होईल,” असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

    या बैठकीत धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या इतर महत्त्वाच्या विकासकामांचाही सखोल आढावा घेण्यात आला. धाराशिव येथे उभारण्यात येणाऱ्या ५०० खाटांच्या आधुनिक जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती, धाराशिव व परंडा येथील न्यायालयीन इमारतीचे बांधकाम, तुळजापूर येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह तसेच विविध रस्ते विकास प्रकल्पांची स्थिती यावर चर्चा झाली. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व प्रकल्प नियोजित वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

    बैठकीस धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    श्रद्धा, विकास आणि सुशासन यांचा सुंदर संगम घडवून श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर परिसराला नवे वैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed