• Wed. Jul 1st, 2026

    राज्यावर पुन्हा अवकाळी पावसासह संकट

    ByMH LIVE NEWS

    Feb 24, 2026
    राज्यावर पुन्हा अवकाळी पावसासह संकट

    मुंबई – ललिता पिल्लेवार

    मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यातही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. सकाळी थोडीफार थंडी आहे तर यासोबतच आता पाऊस सुरू आहे. काल राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वारे आणि विजांच्या कडकाडाटासह पाऊस झाला. आजही अनेक भागात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आला. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा अलर्ट आहे. कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे.

    धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांची तारांबळ उडाली. त्यामध्येच आजही पावसाचा इशारा देण्यात आला. पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

    निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 12.4 नीचांकी तापमान नोंदवले गेले. ब्रह्यपुरी येथे राज्यातील उचांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरी येथे उच्चांकी 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यासोबतच आजही राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. कधी पाऊस तर कधी थंडी आणि उन्हाचा चटका अशी स्थिती झाली आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.

    बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. तसेच माजलगाव तालुक्यात देखील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परळी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू हरभरा पिक पिकांचे नुकसान झाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed