नागपूरच्या मोहपा रोडवर बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा आणि तिच्या वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहपा गावातील सुभाष केशव भिवणकर (वय ५२) हे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या दुचाकीने मुलगी तन्वी सुभाष भिवणकर (वय १६) आणि तिची मैत्रीण वंशिका ज्ञानेश्वर नरुळे (वय १७) यांना घेऊन उमरेडकडे निघाले होते. दोन्ही विद्यार्थिनींची बारावीची परीक्षा असल्याने त्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी घरातून लवकर निघाल्या होत्या. मात्र नियतीने वेगळाच घात केला.
एमआयडीसी पुलाजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे येणाऱ्या गिट्टीने भरलेल्या ट्रकने (क्रमांक MH-40/BG-7750) दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी अक्षरशः चिरडली गेली. या अपघातात सुभाष भिवणकर आणि तन्वी भिवणकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वंशिका नरुळे ही गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १२वीच्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने मोहपा गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ajit Pawar Plane Crash: विमान कंपनीबद्दल DGCA चा चक्रावून टाकणारा निर्णय; रोहित पवारांचा संशय खरा?
दरम्यान, अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालक प्रफुल दशरथ भोयर (वय २७) याला पकडून मारहाण केली. तसेच ट्रकच्या केबिनला आग लावण्यात आली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने उमरेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालकाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. मात्र संतप्त जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक करून नुकसान केल्याची घटना घडली.
नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थितीचा आढावा घेतला. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
