मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील जवाहरनगर सरनाईक वसाहत, 5 वी गल्ली येथे अक्रम बारगीर, त्यांची पत्नी आणि दोन मुले राहतात. इजान हा एकुलता एक मुलगा असून, त्याचे वडील वखारीत काम करतात. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता इजान खेळण्यासाठी घराबाहेर पडला. उशीर झाल्यानंतरही तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, तौसिफ पटवेगार, वसीम पटेल आणि मोहसीन मुल्ला यांनी जवळील मशीदेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यात इजान मशीदेकडे गेला असल्याचे दिसले. कुटुंबीयांनी राजारामपुरी पोलिसांत तक्रारही नोंदवली.
साडेसहा वाजता पुन्हा सीसीटीव्ही तपासात इजान मशीदीपासून पुढे गेल्याचे दिसले, पण दुसऱ्या कॅमेऱ्यात तो दिसला नाही. यानंतर तौसिफ आणि इतरांनी जवळील 20 फूट खोल खड्ड्यात शोध घेतला. पाण्यावरील हिरवा शेवाळ दूर केल्यावर इजानचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला.
आठ वर्षे जुना धोकादायक खड्डा
नागरिकांच्या मते, सात-आठ वर्षांपूर्वी अपार्टमेंट बांधकामासाठी खोदलेला हा खड्डा 260 चौरस फूट रुंद, 40 फूट लांब आणि 20 फूट खोल आहे. महापालिकेच्या 40 फूट डीपी रोडमुळे काम थांबले, पण खड्डा मुजवला गेला नाही. पावसाळ्यात पाणी साचून शेवाळाने झाकलेले असल्याने तो धोकादायक बनला आहे. नागरिकांनी निवेदने दिली, उपोषणही केले, तरी महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यावरून महापालिका आणि कंत्राटदारांमध्ये वाद सुरू आहे.
तब्बल 600 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
या खड्ड्याजवळच उर्दू शाळा असून, तेथे 600 विद्यार्थी शिकतात. शाळेतील विद्यार्थ्यांची या खड्ड्यामार्गे ये-जा होते. इजानच्या मृत्यूनंतर नागरिकांनी महापालिकेला इशारा दिला की, आता तरी खड्डा मुजवा, अन्यथा मोठी दुर्घटना घडेल. “महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप बालकाचा बळी गेला. सदोष मनुष्यहत्या होणार का?” असा संतप्त प्रश्न परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या घटनेने कोल्हापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने खड्डा बुजवावा, अशी मागणी होत आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.