• Fri. Jul 3rd, 2026

    पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 10, 2026
    पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    मुंबई, दि. १० : अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पेसा क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

    मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस विभागाचे सचिव विजय वाघमारे, सहसचिव मच्छिंद्र शेळके, टीआरटीआयच्या सहसंचालक चंचल पाटील, तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री डॉ. वुईके म्हणाले, वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात वैयक्तिक तसेच सामूहिक दाव्यांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून पात्र लाभार्थ्यांना वनहक्क प्रमाणपत्रांचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात ‘आदिवनमित्र’ ही डिजिटल प्रणाली विकसित करून सर्व वनहक्क दाव्यांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे.

    मुंबई उपनगरातील प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन 263 पाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सुमारे 8,338 कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली आहे. राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ जास्तीत जास्त आदिवासी महिलांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

    आदिवासी समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दस्तऐवजीकरण टीआरटीआयच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्थानिक बोलीभाषा, पारंपरिक जीवनपद्धती, नैसर्गिक साधनसंपत्तीवरील अवलंबित्व आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून योजना तयार कराव्यात. आदिवासी समाजातील महापुरुष, क्रांतिकारक यांचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांची निर्मिती करण्यात यावी. आदिवासी समाजासाठी कार्य केलेल्या सर्व महान व्यक्तींच्या जयंती व शहीद दिनांची माहिती संकलित करून त्या आदिवासी विकास विभागामार्फत साजऱ्या करण्यात याव्यात. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन सेवेत रुजू झालेल्या आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. तसेच आदिवासी बहुल जिल्ह्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करावे अशा सूचना मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी दिल्या.

    ०००

    शैलजा पाटील/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed