• Wed. Jul 1st, 2026

    जळगावमधील पाचोरा-जळगाव महामार्गावर कारचा भीषण अपघात

    ByMH LIVE NEWS

    Feb 7, 2026
    जळगावमधील पाचोरा-जळगाव महामार्गावर कारचा भीषण अपघात
    जळगाव
     जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पिंप्राळातील दोन तरुण नातेवाईकांच्या हळदीसाठी गेले असताना त्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हळद आटपून घरी परतताना कारच्या अपघातात या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्यानं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

    अपघात नेमका कसा झाला?

    श्रीरंग सुरेश पाटील (वय 23) आणि प्रसन्न उर्फ यश रवींद्र निमजे( वय 22) हे दोघे तरुण पाचोरा येथील नातेवाईकांकडे हळदीला गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटपून कारने घरी परत येत असताना पाचोरा-जळगाव महामार्ग बिल्ली फाट्याजवळ गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीतील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.

    पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथे हळदीचा कार्यक्रमासाठी गेले असता कार क्रमांक (एम एच 17 बी एल 8808) ही वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातात श्रीरंग पाटील आणि यश निमजे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात पुरोहित रवींद्र सोनार (वय 22) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील उपचार सुरू आहेत. निखिल कच्छवा (वय 23 )अनिकेत भरत कोळी (वय 22), निलेश अनिल वाघ (वय 22) व देवेंद्र पंढरीनाथ कहाणे (वय 24) सर्व रा.पिंप्राळा जळगाव हे चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    श्रीरंग पाटीलचे दोन महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न

    दोन महिन्यापूर्वीच श्रीरंग पाटील हा लग्न बंधनात अडकलेला होता. जेमतेम संसाराचा वेल बहरायला सुरुवात झाली होती. त्यातच काळाने मोठा घात केला आणि श्रीरंग पाटील या अवघ्या 23 वर्षीय तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी व दोन विवाहित बहिणी आहे. पाटील कुटुंबातील तो एकमेव मुलगा असून त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. तसेच प्रसन्न निमजे याचे वडील रिक्षाचालक आहेत. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. यश निमजे हा खासगी फायनान्स कंपनीत वसुली कर्मचारी होता. घराचे आधार गेल्याने दोन्ही परिवारावर मोठे आभाळच कोसळलेलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed