• Wed. Jul 1st, 2026

    12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान

    ByMH LIVE NEWS

    Feb 7, 2026
    12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान
    मुंबई
     राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज, शनिवार ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली असून, जिल्हा परिषदेच्या ७३१, तर आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ हजार ४३८ उमेदवार नशीब आजमवणार आहेत.
    राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा १३ जानेवारी रोजी केली होती. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आज, शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

    या निवडणुकीअंतर्गत १२ जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१ जागा असून, त्यातील ३६९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी ८३, अनुसूचित जमातींसाठी २५ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १९१ जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण २ हजार ६२४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर १२५ पंचायत समित्यांमध्ये एकूण १ हजार ४६२ जागा असून, त्यातील ७३१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी १६६, अनुसूचित जमातींसाठी ३८ आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३४२ जागा आरक्षित आहेत.

    मतपेट्या वाहून नेण्यासाठी ५३५ बस

    जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाकडून ५३५ बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एसटीच्या या बस शुक्रवारी मतपेट्या वाहून नेण्यासाठी पुरवण्यात आल्या, तर शनिवारी पुन्हा या बस मतपेट्या गोळा करण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी सेवा काहीशी विस्कळित होण्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed