• Fri. Sep 11th, 2026

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jan 28, 2026
अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत – महासंवाद

मुंबई, दि. २८ : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने  आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला आहे. अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत झाला आहे, अशा शब्दात कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केल्या आहे.

शोक संदेशात कामगार मंत्री म्हणाले,  अजितदादा म्हणजे कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावर दरारा असलेले व्यक्तिमत्त्व. ‘शब्दाला पक्का नेता’ ही त्यांची ओळख संपूर्ण राज्याला होती. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा आणि रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांची कामे मार्गी लावणारा लोकनेता आपण गमविला आहे.  राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरले आहेत.

मी कामगार मंत्री म्हणून काम करत असताना, अनेकदा त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. प्रशासकीय कामातली त्यांची स्पष्टता आणि वेळेचे नियोजन नेहमीच थक्क करणारे असायचे. कामात कसलीही दिरंगाई त्यांना खपत नसे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच राज्याच्या विकासकामांना नेहमी गती मिळाली. संपूर्ण राज्याला विकासाची नवी दृष्टी देणारे दादा आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांची उणीव सदैव भासत राहील.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि पवार कुटुंबीय तसेच त्यांच्या लाखो समर्थकांना हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना, असेही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed