मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेसेना स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता गट नोंदणी एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थायी समितीत महायुतीचे संख्याबळ मजबूत होणार असून, अर्थसंकल्पासारखे महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करणे सोपे जाईल.
भाजप आणि शिंदेसेना यांची एकत्र गट नोंदणी होणार आहे. स्वतंत्र गट नोंदणी करण्याऐवजी एकत्रित नोंदणी करुन बहुमताचा आकडा भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. याबद्दलचा प्रस्ताव भाजपकडून शिंदेसेनेला पाठवण्यात आला आहे. गटनेतेपद भाजपला आणि प्रतोदपद शिंदेसेनेला असा प्रस्ताव शिंदेसेनेला पाठवला गेला आहे. यावर शिंदेसेना काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
मुंबई महापालिकेत भाजपला ८९, तर शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. या आकड्यांच्या जोरावर स्थायी समितीवर भाजपचे १०, तर शिंदेसेनेचे ३ सदस्य असतील. स्थायी समितीत एकूण २६ सदस्य असतात. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र नोंदणी केल्यास स्थायी समितीत दोघांचं संख्याबळ १३ असेल. अशा परिस्थितीत २६ सदस्यीय समितीत विविध प्रस्ताव पारित करुन घेताना महायुतीची दमछाक होईल. त्यामुळेच दोन्ही पक्ष एकच गट म्हणून नोंदणी करण्याच्या तयारीत आहेत.
भाजप आणि शिंदेसेनेनं एकत्रित गटनोंदणी केल्यास स्थायी समितीत त्यांचं संख्याबळ मजबूत असेल. याचा फायदा त्यांना महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करुन घेताना होईल. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ७४ हजार कोटींचा आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या स्थायी समितीकडे असतात. त्यामुळे स्थायी समितीत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.
शिंदेसेनेकडून त्यांच्या २९ नगरसेवकांची नोंद आज नवी मुंबईतील कोकण भवनात स्वतंत्र गट म्हणून केली जाणार होती. तशा सूचना सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या. पण ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे शिंदेसेनेनं त्यांच्या गट नोंदणीचा कार्यक्रम दोनदा रद्द केला आहे. आज सगळ्या नगरसेवकांना नवी मुंबईला नेण्यासाठी बसदेखील बोलावण्यात आली होती. पण अखेरच्या क्षणी नोंदणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
