अजित पवार यांचे सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयात आज पोलीस गेले. पोलिसांनी यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांच्या या कार्यवाहीनंतर आता अखेर नरेश अरोरा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“आज संध्याकाळी आमच्या डिझाईन बॉक्सच्या पुणे शाखेवर क्राईम ब्रांच येथून काही जण आले होते. मी ऑफिसमध्ये नव्हतो. तसेच आमचे सिनियरही ऑफिसमध्ये नव्हते. त्यामुळे जे कर्मचारी ऑफिसमध्ये होते त्यांना त्यांची विचारले की, इथे काय काम होतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय काम होतं? याबाबत त्यांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जितकी माहिती होती तितकी माहिती दिली”, असं नरेश अरोरा यांनी सांगितलं.
“त्यानंतर त्यांनी काही दस्तावेज मागितले, ते दस्तावेज दाखवण्याची मागणी केली. काही नंबर मागितले. आमचे कर्मचारी म्हणाले की, आमच्या ऑफिसमध्ये आमचे वरिष्ठ नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला ही माहिती अशी देऊ शकत नाहीत. त्यानंतर आमचे कर्मचारी संदीप यांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. आपण कोण आहात, कुठून आला आहात? आपला परिचय द्या, असं आमच्या कर्मचाऱ्याने विचारलं. त्यावर त्यांनी आपण क्राईम ब्रांच इथून आल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आमचे सीईओ आणि सिनियर मॅनेजर अमन सर यांचं नाव आणि फोन नंबर विचारला. जेव्हा आमच्या कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत बातचित करुन देऊ का? असं विचारलं तेव्हा त्यांनी नकार दिला”, अशी माहिती नरेश अरोरा यांन दिली.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरु होती. आम्ही त्या ठिकाणी बिझी होतो. त्यानंतर आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला माहिती मिळाली की, त्यांना एक तक्रार मिळाली होती. त्यामुळे ते आमच्या कार्यालयात आले होते. त्यांनी जो नंबर दिला होता त्यावर आम्ही फोन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण फोन उचलण्यात आला नाही. पक्षाकडूनही उच्च अधिकाऱ्यांसोबत बातचित करण्याचा आली आहे. पण त्यामधूनही नेमकं काय प्रकरण आहे ते समोर आलेलं नाही. आमच्या संस्थेने त्यांना सहकार्य केलं आहे. याआधी सहकार्य हवं असेल तर आम्ही सहकार्य करु”, अशी प्रतिक्रिया नरेश अरोरा यांनी दिली.
“राष्ट्रवादी काँग्रेससाठी आम्ही काम करतोय हे सर्वांना माहिती आहे. आम्ही पूर्ण विधानसभा निवडणुकीत काम केलं. हे आमच्यासोबत पहिल्यांदा घडलेलं नाही. पण महाराष्ट्रात पहिल्यांदा आहे. याआधीदेखील आम्ही या गोष्टीला झेललं आहे. जी सरकारी संस्था आहे तिला आमचं सहकार्य असेल. कारण आम्ही जे काम करतो लोकांसमोर आहे”, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण
दरम्यान, पुणे पोलिसांकडूनदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “पुणे आयुक्तालयाच्या हद्दीतील एका ठिकाणी संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी एक अधिकारी आणि दोन पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी किंवा तिथे काम करणाऱ्या लोकांमध्ये काहीही अनुचित आढळले नाही. त्यानंतर ते पथक तिथून ताबडतोब निघून गेले. तिथे काहीही अनुचित आढळले नाही”, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
