Nashik Politics: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून भाजपमध्ये अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगरनंतर आता नाशिकमध्येही उमेदवारी आणि एबी फॉर्मच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची माहिती पसरताच इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. या ताफ्यामध्ये आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे हेदेखील होते. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नवीन उमेदवारांना तिकीट दिल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही संधी मिळत नसेल, तर मेहनतीचे मोल काय?” असा सवाल अनेक इच्छुकांनी उपस्थित केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यालयात यापेक्षाही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात धडक दिली. घोषणाबाजी, धक्काबुक्की व गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र काही काळासाठी परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
या गोंधळात एका इच्छुक महिला उमेदवाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. दिव्या मराठे असे या तरुणीचे नाव असून पक्षाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आणि उपस्थितांनी तात्काळ हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला. या प्रकारामुळे भाजपमधील असंतोष किती टोकाला पोहोचला आहे, हे स्पष्ट झालं आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत काही तासांवर येऊन ठेपली असताना, बंडखोरीच्या भीतीने भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवारांची यादी शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर केली नव्हती. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गटातील युती तुटल्यानंतर एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आणि त्यातूनच असंतोषाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे.
