ठाकरे बंधूंनी आज पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. त्यांच्या युतीच्या घोषणेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुंबई सोडून उपनगरात स्थलांतरित झालेल्या मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली.
“खरं म्हणजे लोकशाहीमध्ये युती, आघाडी होत राहतात. पण काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात. तशी आमची महायुती गेल्या साडेतीन वर्षांपासून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. पण आता झालेल्या युत्या या सत्तेसाठी, खुर्चीसाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे की, कोण कुणाबद्दल काय म्हणायचं हे जरा बघा. युती कुणाची कुणाशी झाली तरी महायुती महाराष्ट्रात मजबुतीने उभी आहे. आम्ही लोकसभा महायुतीने जिंकलो आहोत. विधानसभा निवडणूक महायुतीने जिंकलो. नगर परिषद निवडणुकांमध्ये मविआच्या सगळ्या पक्षांच्या जितक्या जागा आल्या त्यापेक्षा जास्त आमच्या एकट्या शिवसेनेच्या आल्या. त्यामुळे अशा युत्या या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहेत. काही लोकं मुंबई महापालिकेला स्वत:ची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आता अंडी खात होती. आता कोंबडी कापायला आले असतील”, असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.
“काही लोकं म्हणाली की, ऐतिहासिक युती आहे. पण ते बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहासच विसरले आहेत. ते ऐतिहासिक कंस होऊ शकतं? फक्त स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी हे आहे. अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. पांडुरंग कुठे आहे? विठ्ठल आमच्याकडे आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते की, मुंबईचा विकासाचा अजेंडा काय? एकही शब्द विकासाच्या अजेंडावर बोलला गेला नाही. त्यांनी मुंबईसाठी काय काम केलं? एकतरी काम सांगा. मुंबईकर मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? विकासाचे प्रकल्प कुणी अडवले?”, असे सवाल एकनाथ शिंदेंनी केले.
“आमचा अजेंडा आहे की, मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, वसई, विरार नालासोपारापर्यंत गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासाठी आम्ही क्लस्टर योजना घेतला. पुनर्विकासाचा प्रकल्प घेतला. कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, 40 लाख लोकांना मोफत घरे देणार. इतके वर्ष काय प्रयत्न केले? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला चालना दिली”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
