केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रासाठी 2 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या दोन निर्णयांचा थेट फायदा हा मुंबई आणि पुणेकरांना होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पुण्यातील दोन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पहिला मार्ग हा खराडी ते खडकवासला असा आहे. तर दुसरा मार्ग नळ-स्टॉप ते माणिक बाग असा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात या दोन्ही मार्गाना मंजुरी देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
पुण्यात सध्या लाईन 3, लाईन 1, लाईन 2A आणि लाईन 2B या मेट्रो मार्गिकेंचे कामे तर सुरुच आहेत. पण यामध्ये आणखी दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत पुण्यातील मेट्रो लाईन 4 आणि 4A ला मंजुरी देण्यात आली आहे. खराडी ते खडकवासला हा लाईन 4 म्हणून मेट्रो प्रकल्प आहे. तर नळ-स्टॉप ते माणिक बाग हा 4A असा दुसरा मेट्रो प्रकल्प, अशा दोन्ही मेट्रो प्रकल्पांचा आजच्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘अहंकारामुळे रावणाची लंका जळाली’, फडणवीस म्हणतात, ‘लंका जाळतो म्हणणाऱ्यांकडे…’
खराडी ते खडकवासला हा मेट्रो प्रकल्प 25.5 किमी अंतराचा असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 22 स्टेशन असणार आहेत. यामुळे खूप मोठी कनेक्टिविटी निर्माण होणार आहे. तर दुसरा मार्ग हा नळ-स्टॉप ते माणिक बाग हा 6.1 किमीचा असणार आहे. या मार्गावर 6 स्थानक असणार आहेत. असा एकूण 28 मेट्रो स्थानकांची निर्मिती पुण्यात होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी एकूण 9858 कोटी रुपयांचा निधी नियोजित आहे. दोन्ही मार्ग हे एकूण 32 किमीचे असणार आहेत. पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आहे, अशीदेखील माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
राज्यात सत्तेत, पण नंदुरबारमध्ये महायुतीत कमालीचा राजकीय संघर्ष, नगर परिषद निवडणुकीत 2 आमदारांची प्रतिष्ठा पणाला
दुसरा महत्त्वाचा निर्णय काय?
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रासाठी आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली आहे. बदलापूर-कर्जत कॉरिडोअरने लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला 1324 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे, अशीदेखील महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
