अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला आहे? त्याची माहिती समोर आली आहे. तसेच बिबट्यांनी गेल्या तीन वर्षात अनेक जनावरे फस्त केले आहेत. त्यामुळे वन विभाग लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०२३-२४ : प्रारंभीचा इशारा
या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये ४ नागरिकांचा मृत्यू, ५ जखमी, आणि ३,३८१ जनावरांची हानी झाली. नुकसान भरपाई म्हणून शासनाने ४६२.१७ लाख रुपये वितरित केले.
२०२४-२५ : विक्रमी हल्ल्यांचे वर्ष
हे वर्ष बिबट्यांच्या हल्ल्यांसाठी सर्वाधिक भयावह ठरले. ८ नागरिकांचा मृत्यू, ४७ जखमी, आणि तब्बल ४,५१२ जनावरांचा बळी गेला. शासनाने ६९४.०७ लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली.
२०२५ (चालू वर्ष) : बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू
चालू वर्षात (नोव्हेंबरपर्यंत) ७ नागरिकांचा मृत्यू, १५ जखमी, आणि १,२६१ जनावरांची हानी झाली आहे. यासाठी शासनाने १४९.९२ लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरित केली. गेल्या वर्षाच्या तुलनेत आत्तापर्यंतची आकडेवारी पाहता हल्ल्यांचे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांनी घटले असले तरी, बिबट्यांचा धोका कायम आहे, असं वनविभागाचे म्हणणं आहे.
भीतीचे सावट कायम
संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नेवासा, पारनेर, श्रीगोंदा आणि नगर तालुक्यांमध्ये अजूनही बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसाढवळ्या शेतात जाणं शेतकऱ्यांना धोकादायक वाटतंय. रात्रीच्या वेळी बिबट्यांचे दर्शन आता नेहमीचे झाले आहे.
Bihar Exit Poll: काँग्रेसला केवळ 4 ते 8 जागा, तर NDA थेट 200 पार, POLL DIARY च्या एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी
वन विभागावर निष्क्रियतेचा आरोप
स्थानिक नागरिकांनी वन विभागावर गंभीर आरोप केले आहेत. पिंजरे उभारणे, गस्त वाढवणे, जनजागृती मोहीम हे सगळं केवळ कागदावरच आहे, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढत असतानाही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नागरिकांची मागणी : कायमस्वरूपी उपाय हवेत
ग्रामीण भागातील नागरिकांनी शासनाकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. कायमस्वरूपी बिबट नियंत्रणासाठी ठोस योजना राबवावी, प्रत्येक गावात अधिक पिंजरे आणि रात्री प्रकाशयोजना करावी. बिबट्यांचे हल्ले काहीसे कमी झाले असले तरी धोका अजूनही तसाच कायम आहे. शासनाने आता केवळ आकडेवारी नव्हे, तर दीर्घकालीन उपाययोजना राबवून ग्रामीण भागातील जीव वाचवावेत, तसेच वेळोवेळी जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
संजय राऊतांसाठी एकनाथ शिंदेंचा फोन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अलीकडील घटना : पारनेर आणि कोपरगाव पुन्हा हादरले
पारनेर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांनी भीतीचं वातावरण अधिक गडद केलं आहे. महिन्याभरापूर्वी एका चिमुकल्यावर हल्ला करून बिबट्याने त्याला ठार मारले होते. तर कोपरगावमध्ये गेल्या आठवड्यात चार वर्षांच्या आणखी एका चिमुकल्यावर आणि एका महिलेवर हल्ला करून बिबट्याने दोघांचा जीव घेतला. या घटनांमुळे पारनेर आणि कोपरगाव परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिकांनी शासन आणि वन विभागाकडून तात्काळ ठोस कारवाईची मागणी केली आहे. कोपरगावात नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्राप्त झाले. पण वन विभागाला बिबट्या शोधण्यात यश आलेले नाही.

