• Sun. Mar 15th, 2026
    मोठी बातमी! अजित पवार यांनी समोरासमोर संग्राम जगताप यांचे कान टोचले, बैठकीतील Inside Story समोर

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांचे अखेर समोरासमोर कान टोचल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीला फक्त हिंदूंकडून सामान खरेदी करा, असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहरचे आमदार संग्राम जगताप हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यामागील कारणही तसंच आहे. संग्राम जगताप यांच्याकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. ते कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत. पण ही भूमिका घेत असताना ते टोकाची प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यांनी भर मंचावरुन भाषण करताना धक्कादायक वक्तव्ये केली आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आपल्या वक्तव्यातून समाजातील जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांना केलं होतं. याशिवाय संग्राम जगताप यांच्या भूमिकेवर त्यांच्या पक्षाकडूनही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना नोटीसही पाठवली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती समोर येत आहे.

    संग्राम जगताप यांच्याकडून केल्या जाणऱ्या वक्तव्यांची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील घेतली. अजित पवार यांनी याआधीच त्यांना सूचक इशारा दिला होता. पण तरीही त्यांच्यात हवा तसा बदल न झाल्याने पक्षाने त्यांना थेट नोटीस पाठवली. या नोटीसनंतर संग्राम जगताप यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता आपण अजित पवार यांच्याशी चर्चा करु, असं म्हटलं होतं. यानंतर आता अजित पवार यांनी संग्राम जगताप यांची कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे.

    अजित पवार नेमकं काय म्हणाले?

    “कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये. कुणाच्याही वक्तव्याने तेढ निर्माण व्हायला नको. कुणीही जातीयवादी वक्तव्य करु नये”, अशा शब्दांत अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांची कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत वरळी डोममध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते.

    अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज वरळी डोम येथे आढावा बैठक पार पडली. अजित पवार यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे आमदार देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी सर्वांसमोर आमदार संग्राम जगताप यांची कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे याआधी पार पडलेल्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांची कानउघाडणी केली होती. यानंतर आजच्या बैठकीत संग्राम जगताप यांची कानउघाडणी केली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा