Sangram Jagtap: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत नोटीस पाठवण्याची घोषणा केली असली तरी, जगताप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
अहिल्यानगरमध्ये आज महामानवांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले असून यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, “करमाळ्याला मी जे बोलले त्याची सुरुवात आधी ईदपासून झाली होती. ईद सणाच्या वेळी पत्रके वाटून ईदची खरेदी फक्त आपल्याच दुकानदारांकडून करावी, असे मेसेज व्हायरल करण्यात आले होते. तेव्हा काही वाद होऊ नये म्हणून आम्ही काही लोकांच्या बरोबर चर्चा करून या गोष्टी थांबवायला सांगितले होते. पण एक-दोन वेळा सांगूनही ते थांबत नव्हते, म्हणून आता मी सांगितले की आपल्या लोकांकडून खरेदी करा,” असा खुलासा जगताप यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरमधील विविध घटनांचा उल्लेख करत नाव न घेता मुस्लीम समाजाला लक्ष्य केलं आहे. तसंच नुकत्याच झालेल्या एमआयएमच्या सभेवरून असदुद्दीन ओवेसे आणि इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. “काही दिवसांपूर्वी नगरमध्ये एक हैदराबादचं खुराटलेलं बोकड आलं होतं आणि एक बोकड छत्रपती संभाजीनगर येथून आलं होतं,” असा हल्लाबोल आमदार जगताप यांनी केला आहे.
संग्राम जगताप यांच्यावर पक्षाकडून कारवाई?
पक्षविरोधी भूमिका का घेतली? याची कारणे दाखवा नोटीस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून आमदार संग्राम जगताप यांना पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता संग्राम जगताप हे पक्षाच्या नोटीसला काय उत्तर देणार, त्यांच्यावर कारवाई होणार का, याबाबतच्या चर्चेला उधाण आलं आहे.

