Gold Rate on Dasara : दसऱ्याला सोन्याचे उच्चांकी असतानाही ग्राहकांनी सोने खरेदीसाठी दुकानांत गर्दी केली होती. सोन्यासह चांदीचीही मोठी खरेदी झाली. ग्राहकांचा दसऱ्याच्या मुहुर्तावर संध्याकाळी सोने खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला.
दसऱ्याच्या दिवशी प्रामुख्याने सोन्याची खरेदी केली जाते. यंदा सोन्याचे दर उच्चांकी असल्याने या बाजारात कमी उलाढाल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दसऱ्याच्या आधी ग्राहक सोनेखरेदी करतील, असा एक अंदाज होता.
यासाठी किरकोळ दुकानदारांनी घाऊक बाजारातून आधीच मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती, त्याचे प्रतिबिंग प्रत्यक्ष दसऱ्याला दिसले. ‘घाऊक बाजारांत दसऱ्याच्या दोन दिवस आधीपर्यंत व झवेरी बाजारात प्रामुख्याने बुधवारी गर्दी होती. येथून प्रामुख्याने किरकोळ दुकानदार दागिने खरेदी करतात. प्रत्यक्ष दसऱ्याच्या दिवशी मात्र घाऊक बाजारात फार ग्राहक नव्हते,’ असे मुंबई झवेरी बाजार असोसिएशनचे सचिव कुमारपाल जैन यांनी सांगितले.
सोन्याचा दर गुरुवारी १.२२ लाख रुपये प्रतितोळा (१० रॉम) होता. बुधवारीही हाच दर होता. दर स्थिर राहिल्याने सायंकाळी किरकोळ वाहकांची बाजारात गर्दी दिसली. एक ते पाच ग्रॅम दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. यामध्ये सोन्याच्या नाण्यासह कानातले डूल, सोन्याचे वळे यांचा समावेश होता, काही मोठ्या सराफ दुकानांत लग्नसराईनिमित्त मंगळसूत्रांचीही विक्री झाली. दोन हजार ३०० कोटी रुपयांच्या घरात ही उलाढाल झाल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला.
मुंबई ही देशभरातील सोन्याचे केंद्र असल्याने प्रामुख्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, तसेच दिल्लीतील व्यापारीही झवेरी बाजारात येऊन घाऊक खरेदी करतात. त्यांनी सोमवार ते बुधवारदरम्यान मागील वर्षीपेक्षा २५ ते ३० टक्के अधिक खरेदी केली होती.
नाण्यांना चांगली मागणी
यंदा सोन्याच्या नाण्यांना चांगली मागणी होती. मात्र दर उच्चांकी असल्याने पाच ग्रॅमऐवजी एक व दोन ग्रॅमची नाणी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा होता. त्याचवेळी ग्राहक चांदीची नाणीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत होते. चांदीचे दर उच्चांकावर असताना आणखी दरवाढ होईल, या शक्यतेने पाच, दहा, २०, ३० व ५० ग्रॅमच्या नाण्यांना मोठी मागणी होती. चांदीचा दर गुरुवारी १.५२ लाख रुपये किलोदरम्यान होता.

