• Wed. Jun 10th, 2026

    जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 23, 2025
    जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर – महासंवाद




    मुंबई, दि. २३ (रानिआ) : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.

    राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.

    निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.

    0-0-0

    (Jagdish More, SECM)







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed