Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात एका २७ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुण शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेला असता, जोरदार पावसामुळे चिखल झाल्याने तो रेल्वे रुळावरून चालत होता. त्याचवेळी मागून आलेल्या रेल्वेची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मयत युवकाचे नाव रामप्रसाद मोरे वय 27 वर्ष राहणार कानेगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी असे आहे. याप्रकरणी पूर्ण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामप्रसाद मोरे हा आपल्या कुटुंबीयांसोबत कानेगाव तालुका पूर्णा येथे राहत होता. तो आपल्या कुटुंबासोबत शेती करून उपजीविका भागवत होता. गुरुवारी चार सप्टेंबरला नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास तो शेतात कामासाठी फुकट गावाच्या शिवारात गेला. मात्र पावसाच्या माऱ्याने सर्वत्र चिखल झाला होता. चिखलामध्ये शेतात कामही करता येत नव्हते, म्हणून रामप्रसादने घराकडे रस्त्याऐवजी शेताच्याच बाजूने जाणाऱ्या रेल्वे रुळावरून वाट धरली.
परंतु रामप्रसाद माहित नव्हते की तिथेच त्याचा घात होणार आहे. पाठीमागून रेल्वे येत असल्याची त्याला कल्पनाही नव्हती. रेल्वेची त्याला जोरदार धडक बसली आणि डोक्याला गंभीर मार लागला. आणि दरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील शेतकऱ्यांना झालेला अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रामप्रसाद च्या घरच्यांना व पोलिसांना याची माहिती दिली.
घटनास्थळी तात्काळ पूर्ण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश मुजमुले यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. आणि रामप्रसादचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा देखील करण्यात आला. याप्रकरणी मृत रामप्रसादचा चुलत भाऊ गोविंद बापूराव मोरे यांनी पूर्ण पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश मुजमुले करत आहेत. शेती करून आपली आणि आपल्या परिवाराची उपजीविका भागविणाऱ्या रामप्रसादचा असा अपघाती मृत्यू झाल्याने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

