नांदेड -बंटी फड
किनवट व माहूर तालुक्यात 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली असून शेतजमिनी खरडून पिकांचे शंभर टक्के नुकसान, घरे कोसळून जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर किनवट-माहूरचे आमदार भीमरावजी केराम साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन पाठवून बाधित शेतकरी व नागरिकांना सरसकट आर्थिक मदत, विशेष अनुदान आणि तातडीची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, माहूर तालुक्यात 16,327 शेतकरी बाधित होऊन 17,283 हेक्टरवरील पिके खरडली गेली आहेत, 76 घरे व एक दुधाळ जनावर वाहून गेले आहे. तर किनवट तालुक्यात तब्बल 44,356 शेतकरी बाधित झाले असून कापूस, सोयाबीन, तूर, मका यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे पूल व रस्ते वाहून गेले असून एका स्कूल बस चालकासह दोघांचा मृत्यू झाला आहे.
आ. केराम यांनी तातडीने बाधित शेतकरी व कुटुंबांना आर्थिक मदत देणे, कृषी निविष्ठेच्या नुकसानीवर विशेष अनुदान, तसेच रस्ते-पूल दुरुस्ती व धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंती उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.