• Sun. Jun 14th, 2026

    डोळ्यांमध्ये पाणी पण मनामध्ये धैर्य; लोकल खोळंबल्या, मोनोरेल अक्षरश: झुकली, मुंबईच्या स्पिरीटची वेदनादायी कहाणी

    ByMH LIVE NEWS

    Aug 19, 2025 #Bengal depression rain, #heavy rainfall in mumbai, #Kolhapur Rain Updates, #Maharashtra Heavy Rain Alert, #Mumbai heavy rain, #Mumbai Heavy Rain Updates, #Mumbai monsoon impact, #Mumbai rain alerts, #mumbai rain forecast, #Mumbai rainfall today, #mumbai traffic jam, #Mumbai waterlogging, #mumbai weather update, #Navi Mumbai rain updates, #Thane heavy rain, #अरबी समुद्र कमी दाब पट्टा, #कोल्हापूर रेन अपडेट, #ठाणे मुसळधार पाऊस, #ताज्या बातम्या, #नवी मुंबईतील पावसाचे अपडेट, #बंगालचा उपसागर डिप्रेशन, #मराठी न्युज, #महाराष्ट्र पावसाचा अंदाज, #महाराष्ट्र रेन अपडेट, #महाराष्ट्र हेवी रेन अपडेट, #मुंबई पावसाचा अंदाज, #मुंबई पावसाचे अलर्ट, #मुंबई मुसळधार पाऊस, #मुंबई लोकल ट्रेन अपडेट, #मुंबई हवामान अपडेट, #मुंबई हेवी रेन अलर्ट, #मुंबईत मुसळधार पाऊस, #मुंबईत वाहतूक कोंडी, #मुंबईतील मान्सून अपडेट, #रायगड रेड अलर्ट, #लेटेस्ट न्युज, #विदर्भ पूरस्थिती, #हवामान खात्याचा इशारा
    डोळ्यांमध्ये पाणी पण मनामध्ये धैर्य; लोकल खोळंबल्या, मोनोरेल अक्षरश: झुकली, मुंबईच्या स्पिरीटची वेदनादायी कहाणी

    मुंबई स्पिरीटची नेहमी चर्चा होत असते. मुंबईकर खूप जिद्दी आहेत. कितीही कठीण काळ येऊ द्या. मुंबईकर हा परिस्थितीला सामोरं जातो. तो परिस्थितीशी झुंज देतो आणि त्यातून बाहेरही पडतो. मुंबईकरांच्या या स्पिरीटची आताही चर्चा होतेय. कारण मुंबईवर आज नैसर्गिक आपत्ती आली. या आपत्तीत मुंबईकरांनी अनेक आव्हानांना तोंड दिलं. यानंतर लाखो नागरीक आपापल्या घरी पोहोचले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईत मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु होता. मुंबईची लाईफलाइन मानली जाणारी लोकल ही सकाळी सुरु होती. त्यामुळे अनेक चाकरमानी, सर्वसामान्य नागरीक आपापल्या विविध कामांसाठी मुंबईला रवाना झाले. ते आपापल्या हव्या असणाऱ्या स्थानकांवर पोहोचले. पण पावसाचा वेग वाढल्यानंतर कुर्ला, सायन, दादर या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली. पावसाचा ओघ सुरुच होता. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्ते पूर्णपणे जलमय झाले. लोकल ट्रेनदेखील ठप्प झाली. सुरुवातीला गुदमरत संथ गतीने रेल्वे वाहतूक सुरु होती. पण नंतर ती पूर्णपणे ठप्प झाली. दुपारी जवळपास 12 वाजेपासून मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

    हजारो रेल्वे प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर स्टेशन, कुर्ला, ठाणे यासर विविध रेल्वे स्थानकांवर लोकल ट्रेनची वाट पाहत उभे होते. अनेक तास उलटले तरी लोकल वाहतूक सुरु होत नव्हती. या दरम्यानच्या काळात अनेक प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अनेक जण रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. या दरम्यानच्या काळात काही स्थानकांवर टॉयलेटचीदेखील पुरेशी व्यवस्था नव्हती, अशी तक्रार काही प्रवाशांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. त्यामुळे प्रवासी किती भयानक परिस्थितीतून गेले असतील याची कुणी कल्पना देखील करु शकत नाही.

    प्रवासी रेल्वे रुळावर पायी निघाले

    लोकल ट्रेन सुरु होत नसल्याने अनेक ठिकाणी प्रवासी हे रेल्वे रुळावर उतरले आणि पायी चालत आपल्या घराच्या दिशेला मार्गक्रमण करायला लागले. या दरम्यान रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरच थांबण्याचं आवाहन केलं. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कुठेतरी खोल खड्ड्यात पडून अपघाताची घटना घडू नये यासाठी रेल्वे प्रवाशांकडून आवाहन केलं जात होतं. या दरम्यान संध्याकाळच्या सुमारास पाऊस थांबला होता. त्यामुळे रेल्वे गाड्या सुरु व्हाव्यात अशी प्रवाशांची मागणी होती. पण तरीही रेल्वे ट्रेन सुरु झाली नाही. यामुळे हतबल झालेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन मार्गक्रमण करायला सुरुवात केली. या काळात अनेक प्रवासी नाराज झालेले बघायला मिळाले. अनेकांचे नाराज चेहरे आणि डोळे त्यांच्या मनाच्या आतला कोलाहल सांगत होते. अखेर खूप प्रतिक्षेनंतर संध्याकाळी सात वाजेनंतर मुंबई लोकल धावायला सुरुवात झाली.

    मेट्रो स्थानकाला गळती

    मुसळधार पावसामुळे मुंबईची पूर्णपणे दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी कंबरेइतकं पाणी साचलं. त्यामुळे रस्ते बंद झाले. अनेक ठिकाणी गाड्या पाणीखाली गेल्या. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं. मेट्रो 3 या भूमिगत मेट्रो मार्गावर बीकेसी मेट्रो स्थानकावर गळती होत असल्याचा प्रकार समोर आला. शेकडो कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या या भुयारी मेट्रो स्थानकात गळती होत असल्याचं निदर्शनास आल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

    मोनोरेलही रखडली, नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन

    लोकल ट्रेन सात ते आठ तास बंद पडली. यानंतर मेट्रो स्थानकात गळती झाली. रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. यामुळे लाखो मुंबईकर त्रस्त झाले आणि तरीही मुंबईकरांची परीक्षा पूर्णपणे संपलेली नव्हती. कारण संध्याकाळच्या सुमारास मोनोरेलची घटना समोर आली. भक्तीपार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनोरेल एकाच ठिकाणी थांबली. यावेळी गाडीतील एसीदेखील बंद झाली. बराच वेळ झाला तरी गाडी चालू होत नाही म्हणून प्रवासी हतबल झाले. ही गाडी शेकडो प्रवाशांनी भरगच्च अशी भरली होती. प्रवाशांच्या जास्त वजनाने मोनोरेल अक्षरश: एका बाजूला झुकलेली बघायला मिळाली.

    पाऊण तास झाला तरी मोनोरेल चालू होत नाही म्हणून प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण होऊ लागली. अनेक प्रवासी हे गाडीचे दरवाजे ठोकू लागले. आम्हाला बाहेर काढा म्हणून ओरडू लागले. काही जणांनी मुंबई पोलीस, अग्निशामक दल आणि एमएमआरडीएच्या हेल्पलाईन नंबरला फोन केला. काही वेळाने अग्निशामक दलाच्या गाड्या खाली आल्या. प्रवाशांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या माध्यमातून प्रवाशांना रेस्क्यू करुन बाहेर काढण्यात आलं. अतिशय चित्तथरारक अशी ही घटना होती. या काळात अनेक प्रवाशांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं होतं. आपण मृत्यू अक्षरश: डोळ्यांसमोर पाहत होतो, अशी भावना काही प्रवाशांनी सुटकेनंतर दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा