सोलापुरात शिवसेनेती अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे नेते संजय कोकाटे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“मला शिवसेनेतून काढलं तरी चालेल, त्यांची औकात दाखवतोच. सावंत हे पैशाने मोठे असतील. पण तो पैसा कुठून आला? हा संशोधनाचा विषय आहे. सोलापूर जिल्ह्यात कष्ट आमचं आणि नाव तुमचं झालंय. तुम्ही सेनेसाठी काय केलं? हे आरशात पाहा”, असा टोला शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी शिवाजी सावंत यांना लगावला आहे.
संजय कोकाटेची शिवाजी सावंतांविरोधात संतप्त प्रतिक्रिया
“माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली भेट हे शिवाजी सावंतांच्या राजीनाम्यामागे कारण असावं, असं आम्हाला वाटलं होतं. राजीनामा पत्रातील कारणं पटण्यासारखी नव्हती, त्यामुळे आम्ही सावंतांच्या राजीनाम्यावर काही बोलणार नव्हतो. पण, माढ्यातील पत्रकार परिषदेत ते आमच्यावर बोलले म्हणून शिवाजी सावंतांना उत्तर देत आहे”, असं संजय कोकाटे म्हणाले.
“सावंत हे पैशाने मोठे असतील, पण माणसात मोठे नाहीत. जनतेत शिवाजी सावंत यांचा किती सहभाग आहे, हा संशोधनाचा विषय आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत मला शिवसेनेचे तिकीट देण्यात शिवाजी सावंत यांचा सिंहाचा वाटा होता. त्या उपकराचे ओझे म्हणून मी त्यांच्या अनेकवेळा पाया पडलो की, असं करू नका, तसं करू नका म्हणून. दुर्दैवाने त्यांना स्वतःच्या पुढे त्यांना काहीच माहिती नाही. आम्ही पक्षाकडे थेट जाणं, त्यांना पसंत नाही, त्यामुळे त्यांनी आमच्या विरोधात काम करायला सुरूवात केली. आम्ही जाहीरपणे त्याबाबत कधीही सांगितलं नाही”, असेही कोकाटेंनी सुनावले.
‘माझी दुकानदारी पक्षावर चालत नाहीय; पक्षाने मला सेनेतून काढलं तरी चालेल’
“विधानसभेच्या निवडणुकीत शिवाजी सावंत यांना पक्षाच्या चिन्हावर ४० हजार, तर मला ७० हजार मते मिळाली होती. तरीही ते म्हणणार की गाडीखाली चालणारं म्हणतंय. मीच गाडी ओढतोय, अशी भाषा त्यांनी अनेक ठिकाणी वापरली. पक्षाने मला त्यांच्यावर बोलू नका, असे सांगितले आहे. पण माझं दुकान काय राजकारणावर चालत नाही. मला पक्षातून काढलं तरी चालेल. पण, खरी औकात कोणाची आहे, हे त्यांना सांगणार आहे”, असेही आव्हान कोकाटेंनी शिवाजी सावंतांना दिले.
“आपण तीन वर्षे संपर्कप्रमुख आहात, आपले भाऊ मंत्री होते. पण तुम्ही सोलापूर, पंढरपूर आणि माढ्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर कधी शिवसेनेसाठी बैठक घेतली का?”, असा सवालही संजय कोकाटे यांनी सावंतांना विचारला आहे.

