• Wed. Jul 1st, 2026

    बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 16, 2025
    बळीराजाच्या कल्याणासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही एकत्रित पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न

    ठाणे,दि.16(जिमाका):- बळीराजा हा आपल्या सर्वांचा अन्नदाता आहे. त्याच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे, पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी गटशेती, सेंद्रिय शेती, यांत्रिक शेतीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, त्यांच्याकरिता असलेल्या योजनांचा त्यांना जास्तीत जास्त लाभ द्यावा, याकरिता शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

    उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची ठाणे जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, शांताराम मोरे, डॉ.बालाजी किणीकर या मान्यवर लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सचिन चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, कोकण विभागीय कृषी सह संचालक बालाजी ताटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, तहसिलदार रेवण लेंभे तसेच विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख/कार्यालय प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. नदी, तलाव, बंधारे खोलीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी. खतांचा दर्जा जपावा. शेतकऱ्यांना बी-बियाणे वेळेवर उपलब्ध करून द्यावेत. बांबू, शेवगा, हळद, फणस, सुरण, आवाकाडो, ढोबळी मिरची या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण द्यावे व त्याविषयी जनजागृती करावी.

    मत्स्यपालनासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सामावून घ्यावे, बारमाही पिके घेता येतील असे नियोजन करावे. प्रगत शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज देण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांनी सकारात्मक काम करावे, असे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले की, बांबू, मोगरा लागवड मोठ्या प्रमाणात करावी. शेती अवजारे योजना प्रभावीपणे राबवावी. आवश्यक तिथे वीज प्रतिरोधक यंत्रणा उभी करावी. रासायनिक खतांचा वापर कमी करावा. खतपुरवठा, बी-बियाणे पुरवठा करताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके नेमावेत. फळपिक विमा योजना व इतर पिक विमा योजनांच्या बाबतीत शेतकऱ्यांना अधिक जागरुक करावे. मुख्यमंत्री शाश्वत शेती योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड द्यावी.

    पारंपरिक जलस्त्रोतातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी तसेच पाणी पुनर्भरण होण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात. “शासन आपल्या दारी” उपक्रमाचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला, अशाच प्रकारचे अन्य लोकोपयोगी उपक्रम राबवावेत. “ॲग्रो टुरिझम” वर भर द्यावा. जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करता यावा, यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, त्यादृष्टीने शेतकऱ्यांना प्रोत्साहित व प्रशिक्षित करावे. विविध बँकांमार्फत 70% खरीप पिक कर्ज वाटप करण्यात आलेले असून चालू खरीप हंगामात 100% कर्ज वाटपाचे नियोजन संबंधित यंत्रणांनी करावे. माती परीक्षण करून शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वेळेत देण्याबाबत नियोजन करावे. ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेमध्ये 100% शेतकरी खातेदारांची नोंदणी जून अखेर शेतकरी ओळख क्रमांक काढण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करावे आणि सर्व्हेक्षण वेळेत पूर्ण करावे. पीएम किसान (PM Kissan) योजनेमध्ये पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, याबाबत विशेष खबरदारी घ्यावी, असेही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे शेवटी म्हणाले.

    यावेळी प्रास्ताविकात जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील भात पिकाचे सरासरी क्षेत्र 54 हजार 923.31 हेक्टर असून सन 2024-25 मध्ये 54 हजार 672 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून खरीप हंगाम 2025 साठी 56 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

    ठाणे जिल्ह्यातील नागली पिकाचे सरासरी क्षेत्र 2 हजार 406.23 हेक्टर असून सन 2024-25 मध्ये 2 हजार 946.60 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून खरीप हंगाम 2025 साठी 3 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

    सन 2025 करीता 10 हजार 120 क्विंटल बियाण्याची व 11 हजार 222 मेट्रीक टन खताची मागणी असून जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व जिल्ह्यात खतासोबत कोणत्याही प्रकारचे लिकिंग होणार नाही, याची दक्षता संबंधित सर्व विभागांकडून घेण्यात येणार असून याकरिता जिल्ह्यात 6 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

    खरीप हंगामात खताची टंचाई भासणार नाही यासाठी शासनाने सन 2025 करीता युरिया 650 मेट्रीक टन व डिएपी 10 मेट्रीक टन याप्रमाणे खतांचा संरक्षित साठा उपलब्ध करुन दिला आहे.

    रा.कृ.वि. योजनेंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 साठी 150 गावांमध्ये 15 हजार मृद नमुन्यांची विहीत कालावधीत तपासणी पूर्ण करुन शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका वेळेत देण्याबाबत आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2024-25 मध्ये 1 हजार 154.62 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. सन 2025-26 करीता फळबाग 1 हजार हेक्टर सोनचाफा, मोगरा फुलपिकांचे 100 हेक्टर बांबू लागवडीचे 500 हेक्टर क्षेत्रासाठी नियोजन केले आहे.

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन 2025-26 मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 80 जलतारा कामे घेण्याचे नियोजन केले आहे.

    भात पिकामध्ये संवंर्धित भात लागवड तंत्रज्ञानावर (SRT) भर देण्यात येत आहे. सन 2024 मध्ये 641 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असून सन 2025 साठी 1 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

    कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत सन 2024-25 मध्ये 57 लाभार्थ्यांना रु.46.32 लाख अनुदान वाटप करण्यात आले असून सन 2025-26 करिता 321.00 लाखाचा आराखडा नियोजन केले आहे.

    प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग अंतर्गत सन 2024-25 मध्ये 100 प्रकल्प मंजूर झाले असून सन 2025-26 साठी 300 कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीचे नियोजन करण्यात आले आहे.

    निर्यात वाढ – मॅगोनेट 1 हजार 315 व व्हेजनेट प्रणालीवर 1 हजार 232 शेतकरी नोंदणी झालेली असून यावर्षी 3 हजार 500 शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

    बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत जिल्हयात कृषी विभागाचे 3, माविमच्या 2 प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असून कृषी, माविम अशा महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्प मिळून एकूण 6 नवीन प्रकल्पांना मंजूरी प्राप्त झाली आहे.

    परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत नैसर्गिक व सेंद्रिय शेतीखाली 3 हजार 800 हेक्टर क्षेत्र रुपांतरीत केले असून चालू वर्षी 1 हजार 300 हेक्टर क्षेत्र वाढ होणे अपेक्षित आहे.

    बैठकीच्या सुरुवातीस मोगऱ्याचे रोप देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या बैठकीत प्रगतशील शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री श्री.शिंदे व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीचे औचित्य साधून ठाणे कृषी विभागाच्या व्हॉट्स्ॲप चॅनलच्या क्यूआर कोडचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

    या बैठकीचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धनके यांनी केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed