Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरगाव शिवारातील एका जुन्या बंद खाणीत पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी दुपारी १ ते ४ च्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्यात रविवारी या पाच जणांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता सोमवारी दुपारी कुही तहसीलमधील सुरगाव येथील खाणीतील खड्ड्यात पाण्यात बुडलेल्या अवस्थेत सर्व मृतदेह आढळले आहेत.
Nagpur Crime : 26 वर्षीय तरुणाची देशविरोधी इन्स्टा पोस्ट, दोन महिन्यांपूर्वी भेटलेल्या मैत्रिणीसह हॉटेलवरील छाप्यात सापडला, घराची झडती घेताच…
रोशनी चंद्रकांत चौधरी (३२), मोहित चंद्रकांत चौधरी (१२), लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (१०), रज्जो राऊत (२५) आणि इतिराज अन्सारी (२०) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील रोशनी, मोहित आणि लक्ष्मी हे तिघे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून रज्जो ही रोशनीची बहीण आहे. इतिराज अन्सारी आणि रज्जो हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे मृतांपैकी रोशनी, तिची दोन मुले आणि बहीण असे चौघे एकाच कुटुंबातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही घटना समोर आल्यानंतर कुही पोलीस ठाणे आणि पाचगाव पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकांच्या मदतीने सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. खाणीत पावसाचे पाणी भरलेले असल्याने हे मृतदेह पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आले. सध्या ही घटना अपघात आहे की, सामूहिक आत्महत्या किंवा घातपात याबाबत पोलीस विविध प्रकारे तपास करत आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या प्रकरणाने परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

