मागील वर्षी कोणत्याही बंधनांविना गणेशोत्सव साजरा झाला होता. यंदा अद्यापपर्यंत कोणत्याही निर्बंधांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे उत्साही ढोलताशा पथकांनी सव्वा-दीड महिना आधीपासूनच सरावाला सुरुवात केली आहे. शहरातील मैदाने, मोकळ्या जागा, नदीपात्र, उड्डाणपुलांखालील जागांमध्ये ढोल-ताशांचा आवाज घुमतो आहे.
रहिवासी परिसरात, रुग्णालयांच्या आसपासही ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. हा सराव तीन-चार तासांहून अधिक तास चालत असल्याने परिसरातील रहिवासी, रुग्णालयातील रुग्ण; तसेच अभ्यासिकांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे या पथकांबाबत नागरिकांनी महापालिकेकडे किंवा पोलिसांकडे तक्रार केल्यास कार्यवाही होत नसल्याचाही अनुभव काही नागरिकांना आला आहे. नदीपात्रातील जागा जलसंपदा विभागाची असल्याने महापालिका तेथील परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळे पथकांकडून विनापरवानाच सराव सुरू आहे.
महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून दोन पथकांनी सरावाची परवानगी घेतली आहे. काही ठिकाणी क्रीडा; तसेच समाज विकास विभागाच्या जागांमध्ये सराव सुरू असल्याची माहिती आहे. अन्य ठिकाणी विनापरवानगी सराव सुरू असण्याची शक्यता आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी आपल्या स्तरावर कोणाला परवानगी दिली असल्यास त्याची माहिती देण्याविषयीच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांनी दिली.
पालिकेची बैठक उशिरा
ढोल-ताशा पथकांना सरावाची परवानगी देण्याबाबत पालिकेने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सप्टेंबरमध्ये संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीत चर्चा होऊन पालिकेची भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत गणेशोत्सव अवघ्या १० दिवसांवर येणार असल्याने पथकांना तोपर्यंत वाट पाहणे शक्य नसल्याचे पथकांचे म्हणणे आहे.
मोठमोठे मांडव टाकून ढोल-ताशा पथकांचा सराव विनापरवाना, विनाशुल्क सुरू आहे. छोट्याशा जागेत व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब पथारी व्यावसायिकांकडून पालिका शुल्क आकारणी करते. मात्र, ढोल-ताशा पथकांना परवानेही बंधनकारक नाहीत. त्यांच्याकडून शुल्कही आकारले जात नाही. गिरीश बापट पालकमंत्री असताना त्यांनी सर्वांना एकत्र आणून नियमावली तयार केली होती; पण आता ही नियमावली कोणी पाळत नाही. आताच्या पालकमंत्र्यांनी याविषयी भूमिका घ्यावी.
– संजय बालगुडे, अध्यक्ष, खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सणस मैदानावरही सराव
पुणे महापालिकेच्या कै. बाबुराव सणस क्रीडा मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च करून सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, या ट्रॅकच्या बाजूने ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. सुरुवातीला राजकीय पक्षाच्या वरदहस्ताने पालिकेची परवानगी न घेताच हा सराव सुरू केला गेला. यासाठी कुलूप तोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या सरावाला पालिकेकडून तोंडी परवानगी देण्यात आली. त्यानंतर सध्या दोन-तीन पथकांकडून येथे सराव सुरू आहे. त्याचा त्रास येथे सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना होत आहे.