• Fri. Nov 29th, 2024

    स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन

    ByMH LIVE NEWS

    Aug 18, 2023
    स्वातंत्र्यसेनानी पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन

    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, स्वातंत्र्याच्या लढाईत ज्या महान व्यक्तींनी आपले योगदान दिले. त्यांचे जीवनचरित्र तरुणपिढीने जाणून घेणे आवश्यक आहे. असेच व्यक्तीमत्व ज्यांनी कुष्ठरोग्यांचा सेवेसाठी आपले आयुष्य वाहून दिले, ते म्हणजे पद्मश्री शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन होय. अमरावतीत कुष्ठरोग्यांचे सेवाधाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन’ चे ते संस्थापक होय. त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा मागोवा  घेणारा हा लेख…

     

    स्वातंत्र्यसेनानी डॉ. शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांचा जन्म २५ डिसेंबर १९९२ ला कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील जमखंडी या संस्थेतील आसंगी या छोट्याशा गावी झाला. बालवयातच आई वडीलांचे छत्र हरविले. त्यानंतर त्यांच्यापेक्षा मोठ्या बहिणींनी कै. बहिणाक्का जोशी यांनी त्यांचे संगोपन केले.  हुशार व तल्लख बुध्दीमत्ता असलेल्या शिवाजीरावांचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यात झाले. शालेय जीवनात टिळकांच्या भाषणांनी त्यांच्यावर संस्कार केले. पुढे कलकत्यावरून त्यांनी होमिओपॅथीची पदवी संपादीत केली. कलकत्त्यात असताना रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी ते चांगलेच प्रभावित झाले होते. विवेकानंदांच्या विचारांचे प्रतीक म्हणून त्यांनी भगवा फेटा बांधायला सुरुवात केली आणि अखेरपर्यंत तो फेटा त्यांच्या डोक्यावर होता. काही काळ गोरगरीबांच्या उध्दारासाठी कार्य करणाऱ्या अलाहबादच्या रामकृष्ण मिशनमध्ये त्यांनी सेवा दिली.

    नंतरच्या काळात सन १९१७ मध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने ते अमरावतीला आले.  आणि याच परिसरात त्यांचे कार्य उभे राहिले. दादासाहेब खापर्डे यांच्या मध्यस्तीने नागपूरचे महान थिऑसाफिस्ट अप्पासाहेब मराठे यांच्या कन्या पार्वतीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि अमरावतीवासियांसाठी ते दाजीसाहेब झाले. शिवाजीराव आणि पार्वतीबाई पटवर्धन यांचे जीवन म्हणजे धगधगते यज्ञकुंड होते. १९१८ साली अमरावती शहरात प्लेगच्या महामारीने थैमान घातले होते. प्रेतांचा खच पडू लागला. सगळे अमरावती शहर भयग्रस्त झाले. शासकीय यंत्रणा सुन्न आणि उदासीन होती. याचप्रसंगी त्यांनी वैद्यकीय सेवेचा विडा उचलला. या काळात दाजीसाहेबांनी कोणतेही शुल्क न आकारता व औषधांचाही खर्च न घेता घरोघरी फिरुन रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. त्यांच्या या कार्यामुळे ते संपूर्ण विदर्भात लोकप्रिय झाले.

    स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यात सहभागी

    तो काळ टिळक युगाच्या समाप्तीच्या आणि (१ ऑगस्ट १९२० ला टिळकांच्या मृत्यू) गांधी युगाच्या उदयाचा होता. गांधी विचाराने भारावून जात त्यांनी स्वातंत्र्य लढाईत सक्रीय भाग घेतला. २४ जानेवारी १९२० ला दारुच्या मक्त्याला जाहीर विरोध, ७ जुलै १९२१ ला परदेशी कपड्यांवर बहिष्कार, स्वदेशी कपड्यांचा वापर या गांधीजींच्या आदेशानुसार जाहिर सभेतून निषेध नोंदवून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १० मार्च १९२१ साली महात्मा गांधी अमरावतीला आले असताना, डॉ. पटवर्धनांकडेच थांबले होते. यावेळी महात्मांजींबरोबर दाजीसाहेबांचा सर्व कार्यक्रमात अग्रणी सहभाग होता. यावेळी गांधीजीच्या दिलेल्या हिंदी भाषणाच्या मराठीत अनुवाद पार्वतीबाईंनीच केला होता.

    देशबंधू चित्तरंजनदास, वीर वामनराव जोशी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. २१ डिसेंबर १९२६ रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी दोन तासांकरीता महात्मा गांधी अमरावतीला आहे होते. या कार्यक्रमासाठी दाजीसाहेबांनी स्वत: महात्मा गांधी यांना आमंत्रित केले होते. यानिमित्त गांधीजींच्या एक वर्षांच्या मौन व्रतानंतर त्यांचे भाषण ऐकण्याची संधी अमरावतीकरांना लाभली होती. दाजीसाहेबांना महात्मा गांधीबद्दल फार आदर होता व ते महात्माजींचे चांगले परिचयाचे झाले होते.

    सन १९३० मध्ये सुरुवातीला सुभाषचंद्र बोस व इतर ११ बंगाली देशभक्तांना एक वर्षाची शिक्षा देण्यात येऊन ब्रिटीशांच्या दडपशाहीला सुरुवात झाली. या दडपशाहीविरुध्द दादासाहेबांनी गावोगावी जाऊन भाषणे केलीत, लोकांना जागृत केले. ६ एप्रिल १९३० जालीयनवाला बाग स्मृती प्रित्यर्थ सुरु करण्यात हरताळ /आंदोलन सप्ताहात दाजीसाहेब आघाडीवर होते. रोज प्रचारसभा, जनजागरण सभा घेवून त्याविरुध्द कडकडीत हरताळ पाडण्याचे आवाहन त्यांनी जनमानसांना केले. १९३० ला महात्मा गांधीना अटक झाल्यानंतर इकडे वऱ्हाडात वीर वामनराव जोशी यांनाही अटक होवून दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. या सरकारच्या दडपशाहीविरुध्द त्यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसोबत अमरावती शहरात संपूर्ण हरताळ पाळला. त्यांनी जाहीर सभा घेवून सरकारच्या या कृतींचा कडाडून भाषणातून निषेध नोंदविला. स्फुर्तीदायी व्याख्यानांनी जागृती केल्याबद्दल तसेच स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवल्याबद्दल डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांना १५ जून १९३० ला आणि १२ जुलै १९३० ला असे दोनवेळा अटक करुन तरुंगात पाठविण्यात आले. पटवर्धन दांपत्य तुरुंगवासात असताना त्यांची लहान मुलगी गंभीर आजारी पडली. मुलीचे वडील डॉक्टर, पण तेही तुरुंगात होते. पटवर्धनांना ब्रिटीशांनी अट घातली की, सत्याग्रहात भाग घेणार नाही, असे लिहून द्या तुम्हाला सोडण्यात येईल, पण दाजीसाहेबांनी ठणकावून सांगितले की, ‘देशापेक्षा मला मुलगी मोठी नाही’ पुढच्या काही दिवसांत मुलीचे निधन झाले.

     

    कुष्ठरोगाच्या रुग्णांची सेवा

    तुरुंगवासात असताना त्यांचे लक्ष कुष्ठरोग झालेल्या एका कैद्याकडे गेले. पुढे जाऊन कोणीही त्यास शिवण्याचे धाडस करत नव्हते. त्याला अन्न-पाणी सुध्दा लांबूनच दिल्या जाई. त्याचा सुकलेला चेहरा व हातापायांना जखमा होत्या, त्यातून पू वाहून दुर्गंधी येत होती. त्याच्या या वेदना पाहून डॉ. पटवर्धन कळवळले, त्यांनी त्या क्षणापासूनच त्या रोग्याची सेवा करायला सुरुवात केली. पुढे एकदा शहरातील जवाहर गेटजवळ एक कुष्ठरोगी त्यांना रस्त्यावर बसून भीक मागत असलेला आढळून आला. अंगावर जखमा, हातपायांची बोटे झडलेली, विद्रुप चेहरा अशा अवतारात तो भीक मागत होता. त्याचदिवशी त्यांना असे कळले की, त्या भिकाऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विहिरीतून वास येऊ लागला. पण मृतदेह बाहेर काढयास कुणीही तयार नव्हते. लोकांनी मागणी करुन ती विहीर नगरपालिकेला बुजवायला लावली. याचा शिवाजीरावांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी उर्वरित आयुष्यात कुष्ठरोग्यांची सेवा हेच आपले ध्येय ठरविले.

    नंतरच्या काळात डॉ. भोजराज यांच्यासोबत वरुडला व्याख्यानासाठी जात असताना रस्त्यात बेवारस मरुन पडलेल्या कुष्ठरोग्याचे हाल त्यांनी पाहीले. कुत्रे त्याच्या प्रेताचे लचके तोडत होते आणि लोक निर्विकारपणे त्याकडे पाहत होते. या सगळ्या घटनांचा डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या मनावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी कुष्ठ निर्मुलनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले.

    शिवनी जबलपूर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दाजीसाहेबांनी महात्मा गांधीजीची भेट घेतली असता, गांधीजी म्हणाले देशाचे स्वातंत्र्य निश्चित आहे. पण देशाला भूक निवारण, स्वयंरोजगार, कुष्ठरोग निर्मुलन अशा भीषण समस्यांना तोड द्यावे लागणार आहे. हे माझे अपूर्ण राहिलेले कार्य तुम्ही करावे, असे मला वाटते.  गांधीजींशी बोलल्यानंतर दाजीसाहेबांच्या कार्याची दिशा पक्की झाली आणि त्यांनी कुष्ठ निर्मुलनांचे कार्य अविरत करण्याच्या मनाशी पक्का निर्धार केला.

    कुष्ठ रोग्यांवर उपचार करण्यासाठी कुष्ठधाम उभारण्यासाठी आवश्यक जागेचा सर्वात मोठा प्रश्न होता. अमरावती शहराच्या आजूबाजूच्या परिसरात जागेचा शोध घेण्यास सुरुवात झाली. शहराच्या पूर्वेस ५ किमीवर मोकळी व पडीक जमीन त्यांच्या नजरेस पडली. जुगलकिशोर जयस्वाल हे त्या जमीनीचे मालक होते. दाजीसाहेब तुरुंगात असताना जुगुलकिशोर यांचा मुलगा आजारी पडला होता. अमरावतीमधील तज्ज्ञ व नामवंत डॉक्टरांनी उपचार केले तरी मुलगा दुरुस्त होईना. शेवटी जुगुलकिशोर हताश होवून दाजीसाहेबांना तुरुंगात भेटायला गेले व आपल्या मुलाच्या आजाराची माहिती दिली. दाजीसाहेबांनी ऐकीव माहितीच्या आधारे आजाराच्या लक्षणांचा अंदाज घेवून औषधी लिहून देऊन उपचार केलेत. त्या आजारातून मुलगा पूर्ण बरा झाला. मुलाचे प्राण वाचविल्यामुळे दानशुर जुगुलकिशोर यांनी आपली ८० एकर पडीक जमीन कुष्ठधामासाठी दिली. दाजीसाहेबांच्या जागेची नड लक्षात घेता सुखप्पा प्रेमलवार व लालाशाम या सेवाभावी वृत्तीच्या नागरिकांनीही आपली जमीन स्वयंस्फुर्तीने दाजीसाहेबांना देणगी म्हणून दिली. दाजीसाहेबांना आनंद झाला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली.

    ‘तपोवन’ची स्थापना

    26 सप्टेंबर 1946 या घटस्थापनेच्या दिवशी श्री. जगदंबा कुष्ठनिवास, तपोवन या संस्थेची आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तपोवनमध्ये भजन झाले. त्याप्रसंगी दाजीसाहेबांचे या माळरानांत पहिले भाषण झाले. आज याठिकाणी वीस झोपडया उभ्या आहेत. उद्या या माळरानाचे नंदनवनात रुपांतर नक्कीच होईल. त्यादिवशी दाजीसाहेबांनी तपोवनातच मुक्काम केला. कृष्ठरोग्यांशी चर्चा केली. त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांना दिलासा दिला. स्वाभिमानाने जगण्याचा सल्ला देवून जगण्याची उमेद कुष्ठरुग्णांत निर्माण केली.

    याच सुमारास 15 ऑगस्ट, 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. अखंड भारताची इंग्रजांनी धार्मिकतेच्या आधारावर भारत आणि पाकिस्तान अशी देशाची फाळणी घडवून आणली. त्यानंतर जातीय दंगली जोर धरु लागल्या. निर्वासितांचे लोंढे भारतात येवू लागले. 1 जुलै, 1950 ला मध्य प्रातांचे राज्यपाल मंगलदास पक्कास यांच्या हस्ते संस्थेचे रितसर उद्घाटन होऊन ती ‘विदर्भ महायोगी सेवामंडळ’ या नावाने पुढे नावारुपास आली. गाडगेबाबांनी 1954 साली तपोवनमध्ये येऊन साफसफाई केली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह अनेकांचे पाय या भूमीला सतत लागत राहीले.

    डॉ. पटवर्धन यांचे काम आणि सेवाभावी वृत्तीशी डॉ. राजेंद्र प्रसाद परिचयाचे होते. त्यामुळे या कामाचा सन्मान म्हणून 1959 साली आग्रह करुन डॉ. पटवर्धन यांना पद्मश्री हा सन्मान स्विकारायला लावला.

    दाजीसाहेब हे ध्येनिष्ठ, देशाभिमानी, कडक शिस्तीचे होते. समाजातील इतर नागरिकांप्रमाणे कुष्ठरुणांना मान-सन्मान मिळावा, कुष्ठरोगी स्वावलंबी व्हावेत यासाठी ते सतत झटत.  आजही ‘तपोवन’ च्या कार्यकारणीवर त्यांच्या घरातील कोणी नाही. त्यांच्या पुढच्या पिढीने आपले कार्य इतर क्षेत्रात उभे केले. तपोवनमधून बाहेर पडताना पार्वतीबाईंचे एक वाक्य नजरेस पडले आणि पुन्हा आठवण राहते. ‘आयुष्यभर फक्त एकच केले, स्नेह सहकार्याची ज्योत अखंड तेवत ठेवली, आता देणं घेणं सारं संपंल आहे. मागणं एकच आहे. अनाथ अपंगाकरिता थोडा उजेड ठेवा.’

    संस्थेकडे आज बाराशे ते तेराशे एकर जमीन आहे. डॉ. शिवाजीराव पटवर्धन व पार्वतीबाई यांच्या त्यागातून हे कार्य उभे राहीले. या कार्यासाठी अनेक पुरस्कार त्यांच्याकडे चालत आले आणि पटवर्धनांनी ते नम्रपणे नाकारले. विद्यापीठाची डिलीट स्विकारली नाही. पुण्याचा टिळक पुरस्कार स्विकारला नाही. सगळ्या पुरस्कारांपलीकडे ते होते. कुष्ठरुग्णांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य जगातील सकळ्या पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे,  असे ते म्हणत. त्यांच्या कार्यरुपाने सतत नव्या पिढीला प्रेरणा मिळत असते. अशाच लोकोत्तर, ध्येयनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, सेवाभावी तपस्वी दाजीसाहेबांना कोटी कोटी प्रणाम…

    विभागीय माहिती कार्यालय,

    अमरावती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed