• Fri. Aug 21st, 2026

‘महा वॉकेथॉन’मधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी – मंत्री संजय राठोड – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 21, 2026

मुंबई, दि.२१: माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामाचा आदर्श घेत त्यांची जयंती २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार राज्यात सर्व जिल्ह्यात ‘महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ आयोजित करण्यात आली. यामाध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडले आहे, अशी भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज व्यक्त केली.

वरळी येथील सागर पॉईंटजवळ आयोजित राज्यस्तरीय ‘महा वॉकेथॉन: वॉक फॉर वॉटर २०२६’ या उपक्रमाच्या कार्यक्रम प्रसंगी मंत्री राठोड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, गायक संजू राठोड आदी उपस्थित आहेत.

मंत्री संजय राठोड म्हणाले, माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा, या संदेशातून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात सर्व जिल्ह्यात आयोजित या वॉकेथॉनमध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. माती आणि पाणी संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.

जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर मंत्रालयात केवळ बैठक किंवा सभागृहातील कार्यक्रम घेण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. माती आणि पाणी हे राज्याच्या भवितव्याशी निगडित विषय असून, त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी या विषयाशी जोडले जाऊन जलसंधारणाच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाच्या कामांना संस्थात्मक स्वरूप देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले. भविष्यातील महाराष्ट्रासाठी माती आणि पाण्याचे महत्त्व मंत्री राठोड यांनी यावेळी अधोरेखित केले.

‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम – उपसभापती सचिन अहिर

माती वाचवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवण्याची संकल्पना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. पाणी ही प्रत्येकाची गरज असून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद ही भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात आहे, असे उपसभापती अहिर यांनी सांगितले.

जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे – मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक

जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महा वॉकेथॉनसारख्या उपक्रम कौतुकास्पद आहे. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते आणि पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनी दूरदृष्टीने मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती केली असून, त्यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचा शुभारंभ आरे दुग्ध वसाहतीजवळ सागरी किनारा रस्त्यालगत प्रोमोनेट येथून करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपाला जल अर्पित करुन जलपूजन करण्यात आले. यावेळी माती व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली. यानंतर महा वॉकेथॉनची झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अभिनेते पुष्कर श्रोत्री, क्रिकेटर इरफान पठाण, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजीव-श्रवण, अनिल सिंग, झहीर शेख जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक, सांस्कतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्याने यावेळी उपस्थित होते.

तीन किलोमीटर महा वॉकेथॉनमध्ये मान्यवरांचा सहभाग

जलसंधारणाचे महत्व सांगणारी आणि महाराष्ट्राला जल सुरक्षेचा संदेश देणाऱ्या महा वॉकेथॉनमध्ये मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संपूर्ण अंतर सहभागींसमवेत पायी चालून पूर्ण केले. त्यांच्यासोबत विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, तसेच इतर विभागांचे सचिव सहभागी झाले होते. सर्वांनी सहभागीदारांसमवेत पायी चालत त्यांचा उत्साह वाढविला.

क्षणचित्रे

       आरे दुग्ध वसाहतीपासून ते मद्रासवाडीपर्यंत ३ किलोमीटरची महा वॉकेथॉन.

       अभिनेते पुष्कर श्रोत्री, माजी क्रिकेटर इरफान पठाण, गायक संजू राठोड यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग.

       जल सुरक्षेचे महत्व पटवून देणारे माती वाचवा, पाणी जपा संबोधन गीत.

       तीन किलोमीटर महा वॉकेथॉनमध्ये अरबी समुद्राच्या साथीने विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

       ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून सहभागींना बक्षीस वितरण

०००

निलेश तायडे/गजानन पाटील/ विसंअ

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed