• Mon. Jul 6th, 2026

    ‘क्वांटम तंत्रज्ञान’ भविष्यातील सर्वात मोठे गेमचेंजर – प्रा.उमांकांत रापोल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 15, 2026
    ‘क्वांटम तंत्रज्ञान’ भविष्यातील सर्वात मोठे गेमचेंजर – प्रा.उमांकांत रापोल – महासंवाद


    मुंबई, दि. 15 : क्वांटम तंत्रज्ञान हे पुढील काही वर्षात जगभरात मोठा बदल घडवून आणणारे क्षेत्र ठरणार आहे. “क्वांटम मेकॅनिक्स समजणे अवघड आहे, हे केवळ सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर महान शास्त्रज्ञांनाही आव्हान ठरल्याचे आयशर (आयआयएसईआर) पुणे येथील प्रा. उमाकांत रापोल यांनी सांगितले.

    जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालय येथे आयोजित परिषदेत पहिल्या विशेष सत्रात प्रा. उमांकांत रापोल यांनी क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत संकल्पना आणि भविष्यातील परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

    प्रा. रापोल यांनी सांगितले की, सध्या जग ‘दुसऱ्या क्वांटम क्रांती’च्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पहिल्या क्वांटम क्रांतीतून इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, एमआरआय यासारख्या तंत्रज्ञानांचा विकास झाला, तर दुसऱ्या टप्प्यात क्वांटम संगणण, सुरक्षित संप्रेषण प्रणाली आणि अत्यंत अचूक सेन्सर्स विकसित होत आहेत.

    क्वांटम संगणणांची कार्यपद्धती स्पष्ट करताना त्यांनी ‘क्युबिट’ ही संकल्पना मांडली. पारंपरिक संगणकात माहिती ‘०’ किंवा ‘१’ स्वरूपात साठवली जाते, तर क्युबिटमध्ये दोन्ही अवस्थांचे एकत्र अस्तित्व शक्य असल्याने माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता घातांकी प्रमाणात वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

    सुपरपोजिशन व इनटँगलमेंट या संकल्पना क्वांटम तंत्रज्ञानाचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले. एंटँगलमेंट संदर्भात त्यांनी उदाहरण दिली. केंद्र शासनाने सुरू केलेल्या सुमारे 6000 कोटी रुपयांच्या ‘नॅशनल क्वांटम मिशन’चा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, देशात संशोधन, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान विकासाला मोठी चालना मिळत आहे. पुणे-मुंबई परिसरात मजबूत संशोधन परिसंस्था तयार होत असून महाराष्ट्रही क्वांटम मिशन सुरू करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

    क्वांटम तंत्रज्ञानाचे उपयोग स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, औषधनिर्मिती व आरोग्य क्षेत्रात जलद संशोधन, अत्यंत सुरक्षित डिजिटल संप्रेषण, जीपीएसशिवाय अचूक नेव्हिगेशन, भूगर्भातील पाणी व खनिजांचा शोध आणि अत्याधुनिक सेन्सर्स व अणुघड्याळे या सर्व क्षेत्रांत क्रांतिकारी बदल अपेक्षित आहेत.

    जगभरात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होत असताना भारतानेही वेळेत पावले उचलली आहेत. आता संशोधनाबरोबरच स्थानिक तंत्रज्ञान विकास आणि कौशल्यनिर्मितीवर भर देणे गरजेचे असल्याचे प्रा. रापोल यांनी सांगितले.

    0000

    संजय ओरके/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed