• Mon. Jul 6th, 2026

    सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक 

    ByMH LIVE NEWS

    Mar 19, 2026
    सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक 

    मुंबई

    नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की एका तरुणाचे डोके धडापासून वेगळे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात 23 वर्षीय चालक सागर सांढा आणि 20 वर्षीय कृष्णा रावरिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    प्रशांत जमदाडे या तरुणाचा मृत्यू

    नवी मुंबईतील सानपाडा परिसरात झालेल्या या अपघातात प्रशांत जमदाडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर प्रशांतच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. आरोपींनी आमच्या मुलाचा खून केला आहे त्याला मारल आहे, मात्र पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करून आरोपींना सोडून दिले, बिल्डरच्या घरातील असल्यामुळे पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहेत असे आरोप जमदाडे कुटुंबीयांनी केले आहेत.

    अपघातात तरुणाचे डोकं धडावेगळं झालं

    या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हिट अँड रन ची घटना नाही. कारण मयत युवकाचा आधीच अपघात झाला होता. रात्रीच्या वेळेस दृश्यमानता कमी असल्याने मागून येणारी दोन वाहने अपघातग्रस्त युवकाच्या अंगावरून गेल्याने त्याचे डोके धडा वेगळे झाले असल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

    आरोपीला अटक का नाही? पोलिसांनी दिली मोठी माहिती

    प्रशांत जमदाडे याच्या कुटुंबीयांच्या आरोपावर बोलताना पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळावर सीसीटीव्ही नसल्याने सागर सांढा आणि कृष्णा रावरिया या दोघांच्या वाहनाने अपघातग्रस्त तरुणाच्या अंगावरून वाहन घालवल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यात 3 वर्षाची शिक्षा असल्याने आरोपीला अटक करता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देण्यात आली असल्याची माहिती सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed