राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यावर होत असलेल्या अप्रत्यक्ष आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अपप्रचार केला जात असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला.
“उगीच अपप्रचार केला जात आहे. अपघात झाला त्याच दिवशी स्वत: केंद्रीय विमान वाहतूक मंत्री बारामतीला पोहोचले, त्यांनी एअर क्राफ्ट एक्सिडेंट इनव्हेस्टिगेशन ब्युरो AAIB ही स्वायत्त संस्था आहे, त्यांना तपासासाठी सूचना केली, अधिकार दिला. काही दिवसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी सुद्धा जाहीर केली. त्यामुळे दोन्ही यंत्रणा कामाला लागली होती. परत आम्ही सीबीआय तपासाची मागणी केली”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
‘मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अजित दादांना फोन केला’
“लोकांना माहिती नसेल. मी परत-परत सांगतो. अजित दादा आणि माझ्यात शेवटच्या फोनबाबत काही लोकांनी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मी दिल्लीवरुन फोन केला. अजित दादा कोणत्या शहरात आहेत ते मला माहिती नव्हतं. मी फक्त त्यांना लक्षात आणू देऊ इच्छित होतो की, आमच्या पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांचे शासकीय धान खरेदी झाली आहे त्याचे पैसे पेंडिंग आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पेमेंट काढावेत ही माझी सूचना होती. त्याप्रमाणे त्यांनी पुढची कारवाई केली ते मला माहिती नाही”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
‘हे अतिशय दुर्दैवी’
“लोक म्हणतात की, कुठली राईस मीलची फाईल, ही अतिशय चुकीची बाब आहे. सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फोन केला. अजित दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, तथा अर्थमंत्री होते त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी फोन करणं हे माझं कर्तव्य होतं. ते मी करत होतो. माझ्यामुळे ते उशिरा गेले असे सांगण्याचे प्रयत्न काही लोकं करत आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. अपघात झाल्याने आम्हाला, महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठा आघात आणि धक्का बसला आहे. पण या अशा सामान्य लोकांच्या कामांसाठी फोन केला त्याबाबत तुलना करुन अशा प्रकारे चुकीचा प्रचार करणं हे खेदजनक आहे”, अशी खंत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
“सत्य समोर आलं पाहिजे. चौकशी पूर्ण आणि निष्पक्ष झाली पाहिजे. अजित दादा यांच्या जाण्याने कुटुंबाचं नुकसान झालंच आहे, पण महाराष्ट्र आणि देशाचं देखील खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पूर्ण सत्य समोर यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आम्ही यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार”, अशी भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी मांडली.
