अमरावती
अमरावती महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत लक्षवेधी घडामोडी घडल्या आहेत. अमरावती महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला मतदारांनी कौल दिलेला नाही. त्यामुळे इथे अन्य पक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. भाजप , शिंदेसेनेला मदत करणार नाही, अशी भूमिका एमआयएमच्या राज्य नेतृत्त्वानं घेतलेली असताना अमरावतीत एमआयएमच्या नगरसेविकेनं पक्षादेश झुगारला आहे. त्यांनी भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सगळ्या प्रकरणावर मिराबाई कांबळे यांनीही भाष्य केलं. भाजपचे महापौर पदाचे उमेदवार चांगलं काम करणारे वाटले, म्हणून त्यांना मतदान केल्याचं मिराबाई कांबळे म्हणाल्या. पक्षानं सूचना दिल्या होत्या. पण भाजपचे उमेदवार विकासकामं करणारे वाटले, म्हणून त्यांना मतदान केल्याचा खुलासा कांबळे यांनी केला. पक्षाकडून कारवाई झाली तरीही भरपूर मार्ग असतात, असंही कांबळे पुढे म्हणाल्या.
अमरावतीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. महापालिकेत एकूण ८७ जागा आहेत. पैकी सर्वाधिक २५ जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्याखालोखाल १५ जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. युवा स्वाभिमान पक्षानंदेखील १५ जागांवर यश मिळवलं आहे. युवा स्वाभिमान हा भाजपचा मित्रपक्ष आहे. त्या दोघांचा एकत्रित आकडा ४० वर जातो. एमआयएमनं १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ११ जागांवर विजय मिळवला. शिंदेसेनेनं ३, तर ठाकरेसेनेनं २ जागांवर बाजी मारली. अमरावती महापालिकेत बहुमताचा आकडा ४४ इतका आहे.