कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आता चांगल्याच नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेले माजी सभापती विकास म्हात्रे हे पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांच्यासोबत दिसून आले आहेत.
केडीएमसीचे माजी सभापती विकास म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना बघायला मिळाल्या. पण आता महायुतीत वेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि केडीएमसीचे माजी सभापती विकास म्हात्रे पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले. ज्यांच्या बरोबर होता वाद, आता त्यांचीच लाभली साथ अशीच परिस्थिती डोंबिवलीत पश्चिमेतील शिवसेनेचे उमेदवार विकास म्हात्रे यांची झाली आहे.
वॉर्डात विकास काम होत नाही म्हणून विकास म्हात्रे यांनी भाजपच्या वरिष्ठांवरती नेम साधत पक्ष सोडला आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकीय बोलाचाली दिसून आली होती. मात्र आता महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचं ठरल्यानंतर डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 22 येथे शिवसेनेकडून विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून प्रकाश भोईर, अश्विनी मात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Pune News : उमेदवारीचा वाद विकोपाला! पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याने चक्क ‘एबी फॉर्म’च खाल्ला
मनसे आणि ठाकरे गटाकडून या ठिकाणी उमेदवार देण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने दिवाळीत मनसेमध्ये येऊन उमेदवारी घेतल्याने या प्रभागात चुरशीची लढत होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे बाळा म्हात्रे यांनी अपक्ष फॉर्म भरलाय. त्यामुळे येथे लढत तगडी होणार आहे. महायुतीला फटका बसू नये म्हणून चक्क विकास म्हात्रे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याशी अखेर जुळवून घ्यावे लागले, आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या सोबतच बसून रणनीती आखायला लागली आहे. याचे फोटो आता व्हायरल झाले असून याची चर्चा सुरू झाली आहे.
Municipal Election : मतदानाच्या आधीच गुलाल उधळला, भाजपची विजयी घोडदौड, राज्यभरात 6 नगरसेवकांची बिनविरोध निवड
दरम्यान, विकास म्हात्रे यांनी आता संयमाने परिस्थितीला सामोरं जायंच अशी भूमिका घेतली आहे का? अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात कोण कोणाचा कायमचा दुश्मन नसतो, ना कोण कायमचा मित्र असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
