आगामी काळात राज्यातील अनेक शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. असं असताना जळगावमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत निवडणूक लढण्यासाठी सन्मानाने जागा हव्या असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. तसेच काही लोग आपल्याला गणतीत धरत नसल्याचं त्यांनी भाजपला उद्देशून म्हटलं आहे.
गुलाबराव पाटील नेमकं काय-काय म्हणाले?
“आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका आहेत. निवडणूक आयोगाला 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे तुमची परीक्षा आता जवळ आलेली आहे. त्यामुळे कोणत्या वॉर्डात कोण उभे राहणार याची लगबग प्रत्येक पक्ष करतोय. काही लोकं आपल्याला गणतीतच धरत नाहीत. पण गेल्या वेळी आपण पाहिलं की, वन साईड सत्ता मिळाली. 57 जागा आपल्या मित्र पक्षांना मिळाले. आपले 15 नगरसेवक निवडून आले होते. आपण 15 नगरसेवकांच्या भरोशावर आपल्या परिने जेवढे काम करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न केला”, असं गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले.
‘…तर आमची आडकाठी नाही’
“आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आहे की, सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही. पण सन्माने होत नसेल तर आमची जितकी ताकद आहे त्या भरोशावर आम्ही लढायला तयार आहोत. जिथे सन्मान आहे तिथे प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असते. जिथे सन्मान नाही… शिवसेना ही जन्माला आल्यापासूनच कधी निवडणुका लढायला आलेली नाही. ती समाजसेवेकरता जन्माला आलेली आहे. 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण. आपण आज पाहतोय काही लोकं प्रवेश करत आहेत. ते आपल्याला शहराचा विकास करायचा आहे याच विचाराने प्रवेश करत आहेत. मला तरी असं वाटतं की, हा विकास करत असताना आपण सर्वजण एवढ्या संख्येत आले असताना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.
“महिला सक्षमीकरणाचे निर्णय एकनाथ शिंदे सरकारने घेतला. पहिला निर्णय हा महिलांसाठी एसटीचं भाडे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर महिलांकरता माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा निर्णय घेतला. त्यांनी तिसरा निर्णय हा मुलांनी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. मुलींना मोफत शिक्षण देणारं महाराष्ट्र हे जगातील एकमेव राज्य आहे. आपला आनंदाचा शिधा काही दिवसांपासून बंद झाला असेल. तो दसरा, दिवाळीला मिळायचा. शिवभोजन योजना सुरु केली. एकनाथ शिंदे यांनी कोतवाल, आशा वर्कर, मदत किसान, पोलीस पाटील, गट प्रवर्ग यांचे पगार वाढवले. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला. विशेष म्हणजे रात्री दोन वाजता ईर्शारवाडीचा जेव्हा डोंगर कोसळला ते एकमेव मुख्यमंत्री होते जे वरती गेले”, असं ते म्हणाले.
‘त्यावेळची टीका अजूनही कानात ऐकू येते’
“एकनाथ शिंदे हे एकमेव असे नेते आहेत जे 80 जागा लढले. या 80 पैकी 60 जागा निवडून आले. 40 वर्षात शिवसेनेला जे जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलं. आम्ही ज्यावेळेस गुवाहाटीला गेलो त्यावेळेस आमच्यावर किती टीका झाली. पन्नास खोके एकदम ओकेचे आवाज अजूनही कानात ऐकू येतात”, अशा भावना गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या.

