Manoj Jarange Patil on Hyderabad Gazette : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केले, ज्यामुळे ओबीसी समाजात नाराजी पसरली. ओबीसी नेत्यांनी या निर्णयाला विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली, जी न्यायालयाने फेटाळली. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले, ‘न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे’. त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर खोचक टीका केली आहे.
हैदराबाद गॅझेट विरोधातील जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. गोरगरिबांच्या हक्कांसाठी न्यायदेवता नेहमी उभी राहते. सरकारनंतर न्यायदेवता हा गोरगरिबांचा खरा आधार आहे. त्यामुळे सरकारला आपली बाजू ताकदीने मांडावी लागणारच आहे,’ असे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्या खोचक टीका केली. ‘भुजबळ म्हणजे अलिबाबा, येवल्याचा अलिबाबा दोन आरक्षण खात आहे. ओबीसींच्या काही जाती एससी आणि एसटीमधील आरक्षण खात आहेत. त्यांच्या शिक्षण नोकरीतील जागा हडपल्यात. मराठा आरक्षण टप्प्या टप्प्याने सुरुय आणि ओबीसींनी आतापर्यंत बोगस आरक्षण खाल्लंय. लवकरच भुजबळांना बेसन-भाकरी खावी लागेल,’ अशा शब्दांत जरांगे यांनी टीका केली. पुढे जरांगेंनी असेही नमूद केले की, ‘मी समाजातील गोरगरिबांसाठी सातत्याने काम करत आहे. समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. काही अभ्यासकांनी आजवर समाजासाठी ठोस योगदान दिलेले नाही. उलट गैरसमज पसरवले जात आहेत. पण जनतेने त्याकडे लक्ष देऊ नये.’
दरम्यान, हैदराबाद गॅझेटवरील याचिका फेटाळल्यानंतर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की, जनहित याचिका न करता रिट याचिका दाखल करा. आतापर्यंत आम्ही चार-पाच रिट याचिका दाखल केल्या आहेत,’ असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे मराठा आरक्षण प्रश्नावरचा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. तर भुजबळांनी न्यायालयीन प्रक्रियेत सरकारच्या भूमिकेवर भर देत स्वतःचे मत मांडले आहे.

