• Mon. Jul 6th, 2026

    मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे उल्लेखनीय योगदान – पालकमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 17, 2025
    मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे उल्लेखनीय योगदान – पालकमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद

    • अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत केली जाईल

    परभणी, दि. १७ (जिमाका):  मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील हजारो तरुण या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्युलाही  कवटाळले. या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रेरणेने  जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी  आपण वाटचाल करुयात, असे प्रतिपादन राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

    परभणी येथील राजगोपालचारी उद्यान येथे आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वीरपत्नी व त्यांचे कुटूंबिय, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    प्रारंभी पालकमंत्री बोर्डीकर यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस पथकाने शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.

    पालकमंत्री बोर्डीकर आपल्या संदेशात म्हणाल्या की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानच्या राजवटीखाली होता. त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्यापक प्रमाणात लढा उभारण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. या लढ्यात परभणी जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. परभणी जिल्ह्यातील चारठाणा, वालूर, ब्राम्हणी, माळसोन्ना यासह अनेक गावा-गावातून मुक्ती संग्रामाचा लढा स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. विनायकराव चारठाणकर,   मुकुंदराव पेडगावकर, दादासाहेब चारठाणकर, शंकरराव खळीकर, हरिहरराव कहाळेकर, श्रीनिवासराव बोरीकर यांच्या बरोबरीने इतर नेत्यांची सुद्धा कामगिरी उल्लेखनीय आहे. लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान महत्त्वपूर्ण होते. गीताबाई चारठाणकर, शांताबाई पेडगावकर यासह जिल्ह्यातील अनेक महिलांनी  लढ्यात अनन्य साधारण कामगिरी बजावली. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. अखेर निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर वाढते अत्याचार पाहून भारत सरकारने हैद्राबाद राज्य भारतात विलीन करण्यासाठी लष्करी मोहिम हाती घेतली. या मोहिमेला “ऑपरेशन पोलो” हे नाव देण्यात आले. जनरल जे. एन. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने 13 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबादवर मोर्चा चढवला. अवघ्या पाच दिवसांत निजामाचा पराभव झाला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जोखडातून हैद्राबाद संस्थान  भारतीय संघ राज्यात विलीन झाले.  पुढे राज्य पुनर्रचना झाल्यावर मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला.

    मराठवाड्यात आपला परभणी जिल्हा कृषी, शिक्षण, प्राचीन स्थळं आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. आता आपला जिल्हा सर्वांगिण विकासात गतीने पुढे जात आहे, ही आपल्यासाठी भूषणावह बाब असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असली तरी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने मदत केली जाईल. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांची जयंती  2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा” राबविण्यात येणार आहे. आजपासून प्रारंभ करण्यात येणाऱ्या या पंधरवड्यामध्ये विविध शासकीय विभागांमार्फत लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना महसूल, कृषी, आवास योजनांसह विविध योजनांचा लाभ  देण्यात येणार आहे, या  “सेवा पंधरवडा” मोहिमेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा.

    मराठा आंदोलनात मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी रुपये 10 लाख अशा जिल्ह्यातील नऊ मृत व्यक्तींच्या वारसांना एकूण 90 लाख रुपये शासनाकडून देण्यात येणार आहेत. तसेच त्यांच्या वारसांना शासकीय किंवा निम शासकीय विभागात नोकरी देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

    पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आठव्या राष्ट्रीय पोषण महाचा प्रारंभ मध्य प्रदेशातील धार येथून होत आहे.  या अंतर्गत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” हे आरोग्य विभागाच्या मेगा हेल्थ कँप सोबत राबविले जाणार आहे.  या अभियानात प्रामुख्याने महिला, मुली व बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाचा महिलांनी अवश्य लाभ घेऊन आपले आरोग्य निरोगी ठेवावे.

    आपला जिल्हा हरीत करण्यासाठी यावर्षी सुमारे 30 लाख वृक्ष लागवडीचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 15 लाख वृक्षांची लागवड झाली असून उर्वरित वृक्ष लागवड या महिना अखेर पूर्ण करण्यात येणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की,  ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजना आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात आपला जिल्हा सौर ऊर्जेत आघाडीवर राहावा, अशी मी अपेक्षा करते. विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळवून देण्यात येत आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दोन हजार 23 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये 14 कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे, शेतकरी, महिला, तरुण, कामगार आणि विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना राबवणे हे उद्दिष्ट ठेवून आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. जनतेच्या हितासाठी राज्यशासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवित आहे, आपल्या जिल्ह्यातही या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यात येतील, अशी  पालकमंत्री यांनी ग्वाही दिली.

    यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, वीर पत्नी व त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed