Pune News Today: पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक नियोजनाची तयारी केली असून शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत.
‘यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी सर्वसमावेशक नियोजन आखलं आहे. मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील अनेक मार्गांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक आणि सुरक्षेची तयारी करण्यात येत आहे,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी दिली.
आमदाराच्या आईला हार्ट अटॅक; शिंदे मदतीला धावले, एअर अॅम्ब्युलन्स पाठवली अन् स्वत: विमानतळावरही पोहोचले!
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सकाळी मानाच्या गणेश मंडळांसह मध्यवर्ती भागातील महत्त्वाच्या गणेश मंडळांना भेट देऊन मंडप, परिसरातील वाहतूक आणि बंदोबस्त याची पायी फिरून पाहणी केली. त्यांनी मेट्रो स्थानकांचीही पाहणी केली. या वेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख, उपायुक्त कृषिकेश रावले आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त हिमंत जाधव उपस्थित होते. पाहणीनंतर पोलिस आयुक्तांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
गणेशोत्सव हा राज्यातील सर्वांत मोठा उत्सव असल्याने सुरक्षेवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तैनात राहतील. समाजकंटकांवर तत्काळ कारवाई होईल. मोबाइल सर्व्हेलन्स युनिट्स म्हणजेच ‘मिनी कंट्रोल रूम’ तयार करून चौकशी गतिमान करण्यात येईल. गुन्हे शाखा सतत गस्त घालून बेकायदा कृत्यांवर कारवाई करील. प्रमुख चौक व मंडळ परिसरात सीसीटीव्ही निरीक्षण वाढविण्यात येणार आहे.

