Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, त्यांना हव्या असलेल्या मंत्रिपदावरून काही अडचणी येत असल्यामुळे प्रवेश रखडल्याची शक्यता आहे.
जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण येण्याचं टायमिंग देखील महत्त्वाचं आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्याची काल चांगलीच चर्चा होती. पण त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड आणि नंतर खासदार सुप्रीया सुळे यांनी वृत्ताचं खंडन केलं. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे सर्वकाही ठरलं आहे. आता केवळ टॉपच्या खात्याचं मंत्रिपद मिळालं तर जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. असं असलं तरी हे सगळं भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असल्याची देखील माहिती आहे.
आतापर्यंत पडद्यामागे काय काय घडलं?
‘एबीपी माझा’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांची भाजप प्रवेशासाठी राज्यातील भाजप नेतृत्वाशी दोनवेळा चर्चा झाल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांना राज्य मंत्रिमंडळातील टॉपच्या पाच पैकी एक खातं हवं आहे. पण सध्याच्या स्थितीत तसं खातं देणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कठीण आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपमधील काही मंडळींचा जयंत पाटील यांच्या प्रवेशाला विरोध असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला कधी मुहूर्त मिळेल? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
जयंत पाटील यांनी याआधी अर्थ, गृह, ग्रामविकास आणि जलसंपदा खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांना अशाच प्रकारचं टॉपचं खातं भाजपला द्यावं लागेल. पण सध्याच्या स्थितीत तीन मोठ्या पक्षांचं सरकार आहे. यापैकी अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. तर गृह स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे टॉपच्या 5 खात्यांपैकी एक खातं जयंत पाटील यांना देणं भाजपला कठीण होणार आहे. यामुळे जयंत पाटील यांचा पक्षप्रवेश रखडल्याची चर्चा आहे. आगामी काळात भाजपला जयंत पाटील यांची मनधरणी करण्यात यश मिळतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

